दह्यासारखे व्हावे. सर्वांमध्ये मिसळावे, पण स्वतःचे अस्तित्व, संस्कार कायम जपावेत


यंदा बाप्पाला निरोप देताना होणारा दंगा गोंगाट यावर्षी इथे कमी होता. अपवादाने असेल कुठतरी..! नेहमीच अशी शांतता असायला हवी. देवधर्म ही गोष्ट अत्यंत वैयक्तिक असायला हवी. पण हल्ली ज्या त्या गोष्टी सोशल मीडियावर टाकतो आपण.!


ही भक्ती नाही फोटोशूटसाठी केलेले प्रदर्शन वाटते मला.‌‌ खरतर कितीतरी सामाजिक संघटना समाजउपयोगी कामं करत असतात. निव्वळ मदत करण्याची भावना घेऊन. पण मंडळांनी आपली गणेशोत्सवातही ही समाजाच्या प्रति कर्तव्य भावना जागृत ठेवायला हवी.!

आज बाप्पाला निरोप द्यायचा. बाप्पाचा निरोप किती हृदयस्पर्शी भावना, विसर्जन.! संस्कृत मधील 'सृज' या धातूला 'अन' हा प्रत्यय लागताना त्यातील 'ऋ'चा गुण 'अर' होतो आणि 'सर्जन' असे रुप होते. सर्जन म्हणजे निर्माण करणे. म्हणून स्त्रीला 'सर्जना' म्हणजे निर्माण करणारी असे म्हणतात.

विसर्जन म्हणजे जे सर्जन केले आहे, त्याला निरोप देणे. यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ज्याला सुरवात आहे. निर्मिती आहे, तिथे शेवटही आहे. शेवट हा कधी असतो ते आपल्या हातात नसते. मात्र या शेवटाचा सतत आठव असावा माणसांला.!

दूरगांवी जाताना.. शेवटचा निरोप घेताना, दह्याची कवडी हातावर ठेवली जाते. आता चाललाच तर तुमचा प्रवास सुखाचा होवो. इथे 'दही' हे स्नेह असे प्रतिक आहे. दूर जात असला तरी आपले परस्परांवर असलेले प्रेम दह्यासारखे दाट राहू देत.

दह्यात दुसऱ्यांना बदलवायची शक्ती असते. दूधात मिसळले की दह्याला आपल्यासारखे बनवते. आपणही दह्यासारखे व्हायला हवे. सर्वांमध्ये मिसळायचे, पण स्वतःचे अस्तित्व, संस्कार कायम जपायचे.. त्याबरोबर जाताना जुन्या कटु आठवणींचे विसर्जन मात्र करायला यायला हवं..!

- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !