आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा
अहमदनगर - नेवासे तालुक्यातील घोडेगाव व झापवाडी परिसरातील जागरुक युवकांनी संयुक्तरित्या दोन संशयित चोरट्यांना पकडले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री सव्वा ते साडेदहा वाजेच्या सुमारास झापवाडी गावाच्या शिवारात घडली. पकडलेल्या संशयितांना सोनई पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
नेवासे तालुक्यातील घोडेगाव, झापवाडी, शिंगवे तुकाई, राजेगाव रोड परिसरात मागील आठवड्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गौरी गणपती सणाच्या कालावधीत घोडेगावात एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. तर मागील आठवड्यात एकाच रात्री ५ घरे फोडली होती. दाोन ठिकाणी रोकड व दागिने चोरीला गेले होते. या आरोपींचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यामुळे घोडेेगावात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.
बुधवारी रात्री शिंगवे तुकाई परिसरातून एका शेतकऱ्याच्या शेळ्या चोरीला गेल्या. घोडेगावात तर वेगवेगळ्या वस्त्यांवर नागरिकांना संशयास्पद हालचाली आढळून आल्या. याची माहिती ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या मार्फत तत्काळ ग्रामस्थांना मिळत असल्याने नागरिक सतर्क होत आहेत. परंतु, चोरट्यांच्या भितीने रात्रभर जागे रहात आहेत.
असे पकडले संशयित : शुक्रवारी रात्री झापवाडी शिवारात एका वस्तीजवळ दोघा जणांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यामुळे झापवाडीच्या युवकांनी घोडेगावातील युवकांशी संपर्क साधला. दोन्ही गावच्या जागरुक तरुणांनी तत्काळ घटनास्थळी जात दोघांना ताब्यात घेतले. ते दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने सोनई पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांची विचारपूस केली.
ते दोघे नेमकेे कोण : झापवाडी शिवारात ताब्यात घेतलेले संशयित शेवगाव परिसरातील असल्याचे सांगत आहेत, तसेच चोरी करण्यासाठी आल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी MBP Live24 शी बोलताना दिली. त्यामुळे त्यांना पकडून सोनई पोलिस ठाण्यात नेले. सुमारे शंभरहून अधिक युवक घटनास्थळी जमले होते. पोलिस आता संशयितांची चौकशी करत आहेत.
ड्रोनचे गौडबंगाल कायम : घाेडेगाव, शिंगवे तुकाई व राजेगाव रोड परिसरात रात्री नऊ वाजेनंतर आकाशात संशयास्पदरित्या ड्रोन फिरत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. याचे व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. यासंदर्भात पोलिस किंवा प्रशासनाकडूनही समाधानकारक खुलासा झालेला नाही. शुक्रवारी रात्री युवकांनी पकडलेल्या संशयितांकडे मात्र ड्रोन वापराचे साहित्य आढळलेले नाही, त्यामुुळे आकाशात फिरत असलेले ड्रोनचे गौडबंगाल मात्र कायम आहे.
युवकांचा रात्रभर पहारा : घोडेगावातील जागरुक युवक रात्री जागून गावात पहारा देत आहेत. वेगवेगळ्या वस्त्यांवर चोरटे आल्याची माहिती मिळताच युुवक तेथे जाऊन खात्री करतात. घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना कळवली जाते. पोलिसांनीही तक्रारी येेणाऱ्या भागात गस्त वाढवली असल्याची माहिती सोनई पोलिसांनी दिली आहे, तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचेे आवाहन केले आहे.