'द शो मस्ट गो ऑन', म्हणणं आणि अनुभवणं.. यातलं अंतर


एखादा दुःखद प्रसंग घडला किंवा महत्वाच्या प्रसंगी जवळची व्यक्ती गैरहजर असेल तर कुणावर अवलंबून न राहता आलेल्या प्रसंगावर मात करीत तो निभावायचा.. तेव्हा अर्थात 'शो मस्ट गो ऑन' हा डायलॉग बऱ्याचदा कानावर पडतो..


अर्थातच जीवनाचं तत्त्वज्ञान सांगत असावं हे वाक्य. खरंच कोणत्याही दुःखद विरहाच्या क्षणी हे वाक्य अलगद जिभेवर येतं असतं. पण खरंच सांगु का, वरील डायलॉग रोजच्या जगात धीर देणारे असले तरी आपल्या जवळचा, आपणांस प्रिय असलेला, निकटचा, ज्यावर तुम्ही भरभरून प्रेम करता, ती व्यक्ती तुमच्या जीवनातील अविभाज्य घटक बनली आहे.

दुर्दैवाने ती व्यक्ती तुमच्यातून निघून गेली... तो प्रसंग तुमच्यासाठी धक्का असतो. त्या व्यक्तीसोबत जगलेले, अनुभवलेले कितीतरी क्षण तुमच्या डोळ्यासमोरून तरळून जातात. हे सारे क्षण, त्याचं तुमच्या जीवनातील स्थान, तुमच्याशी जडलेल नातं.. यांना क्षणातच विसरायचं का.? शक्यच नाही.

अशी कितीतरी माणसे आहेत ज्यांचं तुमच्या आयुष्यातील स्थान मोलाचं आहे. माणसाचं जगणं मुळी दुसऱ्यावर अवलंबून असतं. आपण सहवासप्रिय असतो. तुम्हाला प्रिय असलेली बरीच माणसं तुमच्या आमच्या आयुष्यातून दुर्दैवानं निघून गेली असतील.. त्यांचं तुमच्या आयुष्यातील स्थान किती मोलाचं होतं हे आठवून बघा..

ती गेली... तुम्ही आतून हलला असाल. दिवस जात असतील... जगण्याच्या ओघात त्यांचा विसर पडला असेल.. पण ते आठवले की डोळ्यात टचकन अश्रू तरळून जात असतील. भावूक होत असाल... काही क्षण सुचत नसेल तुम्हाला...! त्यांच्या आठवणींनी सैरभैर झाला असाल..

हो, त्यांच्या जाण्याने तुमच्या जीवनाला कोच पडली असेल, वेदना झाल्या असतील, नियतीचा खेळ स्वीकारावा लागतो. पण त्यांचं जाणं वैयक्तिक तुमच्यासाठी आयुष्यभराचं दुःख होऊन बसतं.

तरीही आपला प्रवास चालू असतो, 'शो मस्ट गो ऑन' असं जड मनाने म्हणायचं असतं. वेदनांवर फुंकर घालतांना स्वतःला सावरायचं असतं, नाईलाजाने..!

- जयंत येलुलकर (अध्यक्ष, रसिक ग्रूप, अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !