डे स्पेशल : 'सर्जिकल स्ट्राईक' पुन्हा हवाय तो देशहितासाठी

आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा

भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'च्या आठवणीना स्मृतीदिनी 29 सप्टेंबर रोजी उजाळा मिळाला. मात्र आज देशाचे अस्तित्व संंपवू पहाणाऱ्या भिषण समस्यांच्या मुळाशी लागलेल्या 'कॅन्सर रुपी' रोगावर पुन्हा एक घातक सर्जिकल स्ट्राईकच 'रामबाण' उपाय ठरु शकतो, असे मला वाटते.

29 सप्टेंबर 2016 रोजी, भारतीय लष्कराच्या कमांडोंच्या पथकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये एक किलोमीटरपर्यंतच्या अतिरेक्यांच्या प्रशिक्षण तळांवर हल्ला केला. या धाडसी कारवाईत अतिरेकी संघटनांचा मनका तोडून अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घातले.

भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात 18 सप्टेंबर 2016 रोजी उरी येथे चार अतिरेक्यांनी भारतीय सैन्याच्या चौकीवर हल्ला करून 19 सैनिकांना ठार मारल्यानंतर दहा दिवसांनी हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तानची नांगी निश्चितपने ठेचून एक परकीय कुरापात आपण रोखली.

मात्र, आता देशाला हानी पोहचवणाऱ्या अंतर्गत शत्रूरुपी समस्यांचा खात्मा करून खऱ्या अर्थाने देशवासियांच्या हितासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी असेच एक घातक 'सर्जिकल स्ट्राईक' राबविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

कर्मकांडानी झालाय घात : परकीय आक्रमणे होत असताना बहुतांश भारतीय समाज हा त्यावेळी अहिंसा, (अति) सहिष्णुता, तप-तपस्या, यज्ञ-हवन, व्रत-वैकल्ये, उपास-तापास, पाप-पुण्य, स्वर्ग-नर्क, सोवळे-ओवळे, १०८ वेळा मंत्र, मुहूर्त-शुभ मुहूर्त इत्यादीच्या चक्रात अडकून पडला होता. आणि त्याचाच गैरफायदा बाहेरील क्रुर आक्रमकांनी घेतला. परकीय दिवसाढवळ्या कत्तली, लुटालूट करीत असतांना आपण मात्र देवाचा धावा करीत होतो.

खेकडा प्रवृत्ती परकीय आक्रमकांना देशातील काही शूरवीर योद्धांनी विरोध केला परंतु फंद-फितुरी आणि आप-आपसातील भाऊबंदकी, द्वेष, वैरभाव, देशाभिमानाचा अभाव इत्यादी कारणांमुळे त्यांचे प्रयत्न प्रत्येक वेळी तोकडेच पडले, त्यामुळे क्रुर आक्रमकांचे चांगलेच फावले.

श्रीकृष्ण भूमीत घडले कसे ? : खरेतर गर्भगळीत अर्जुनाला हाती शस्त्र घेऊन दुष्ट, पापी आणि अन्यायी कौरवांविरुद्ध लढण्यास प्रेरणा देऊन ५००० वर्षांपूर्वी कर्मयोगी बनण्याचा उपदेश देणाऱ्या भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमीत हे कसे काय शक्य झाले? हा प्रश्न नेहमी मला पडतो.

अर्थशास्त्रीय सिद्धांत आणि भारतपहिल्या महायुद्धानंतर आर्थिक मंदीच्या खाईत गेलेले जग हे प्रसिद्ध अर्थशास्त्री सर जॉन मेनार्ड केन्स यांच्या सिद्धांतामुळे पुन्हा जागेवर आले. या विद्वानाने त्याचा सिद्धांत भारताला कसा लागू होईल, असे विचारल्यावर उत्तर दिले होते की, 'भारताच्या आर्थिक समस्यांचे मूळ अर्थशास्त्रात आहे का, हे आधी भारताला तपासून पाहावे लागेल.'

हेच सूत्र पकडून मला वाटते की डोळ्याला दिसणाऱ्या समस्या काही वेगळे रूप घेऊन सामोऱ्या येत असतात पण त्यांचे मूळ हे वेगळेच असते. बरेच वेळा मूळ रोग वेगळ्या ठिकाणी असतो आणि उपाय मात्र वेगळ्याच ठिकाणी केला जातो. अशा वेळी तो रोग वेगळे स्वरूप धारण करून अवतीर्ण होतो. एक वेळ अशी येते की तो रोग हाताबाहेर जातो आणि मग प्रत्यक्षात थेट 'शस्त्रक्रिया'च करावी लागते.

लोकसंख्या एक शाप : माझ्या मते भारताची सर्वात मोठी आणि खरी समस्या आहे प्रचंड लोकसंख्या. सत्तर वर्षात साडेतीन पट लोकसंख्या वाढावी हे कौतुकास्पद मानायचे का हास्यास्पद? बरे, जी लोकसंख्या वाढली आहे त्याला खरंच मानवी भांडवल म्हणता येईल का? फक्त एक कल्पना करा, कि भारताची लोकसंख्या आज जर ७५ कोटी असती तर .. अनेक समस्या अदृश्य झाल्या असत्या किंवा अदृश्य होण्यासाठी निर्माणही झाल्या नसत्या.

समस्या डोळ्यांना दिसणाऱ्याडोळ्याला दिसणाऱ्या समस्यांची खूप मोठी यादी देता येईल. जसे की आर्थिक विकासाचा दर, बेरोजगारी, कृषीमालास योग्य तो भाव न मिळणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जातीयवाद, धार्मिक तेढ, शिक्षणव्यवस्थेची दैना, वाढती गुन्हेगारी, अन्नाची नासाडी, आरक्षण, ब्रेन ड्रेन, वाढती आरक्षणे, आरोग्याच्या समस्या, महिलांची सुरक्षा, वाढते अतिरेकी हल्ले, पाकिस्तानची घुसखोरी, चीनी वस्तूंची वाढती आयात, डॉलरचा वाढता दर, पेट्रोलचे वाढते भाव वगैरे.. माझ्या दृष्टीने हे सर्व परिमाण आहेत.

मुळात किड वेगळीच : भारताची मुख्य समस्या ही वेगळीच आहे. शोध घेत  मुळाशी खोलवर गेल्यावर लक्षात येते, तो प्रथम  प्रचंड लोकसंख्या आणि याबरोबरच मग त्या पाठोपाठ समस्यांची मोठी यादी देता येईल. ती म्हणजे भ्रष्ट राजकारणी, भ्रष्ट जनता, भ्रष्ट सरकारी यंत्रणा, भ्रष्ट प्रसिद्धी माध्यमे, वैज्ञानिक दृष्टीचा अभाव,  शिक्षण व्यवस्था विषयक धोरण नसणे, राष्ट्रवादाचा अभाव  (राष्ट्रवाद म्हणजे धर्मवाद नव्हे बर का), धर्मविषयक चुकीच्या कल्पना, भोंगळ दैववाद म्हणजेच बुद्धीप्रामाण्यवादाचा अभाव, भोगवादी जीवनात आनंद वाटणे, पाश्चिमात्य संस्कृतीचा अंधपणे केलेला वाढता स्वीकार आदी.

इथल्या संस्कृतीवर, गोर-गरिबांवर, दुबळ्यांवर बाहुबली, धनाढ्य, धर्मांध, स्वकीय तसेच साम्राज्यविस्तारवादी परकीय शक्तींकडुन आक्रमणे होत आहेत, परंतु आपण गत इतिहासातून काहीच धडा घेतलेला नाही आणि हीच भारतीयांची मुख्य समस्या आहे.

स्वामी विवेकानंद यांनी म्हंटले आहे कि, तुमच्यात दुष्ट, आक्रमक बनण्याची हिंमत नाही म्हणुन जर तुम्ही चांगले वागत असाल तर तो चांगुलपणा कुचकामी आहे. कारण, अहिंसा ही ताकदवान, सशक्त देशाला अथवा व्यक्तीला शोभते कमजोर, भित्र्या आणि दुबळ्याला नाही. त्यासाठीच ज्याला ज्या भाषेत समजते त्या भाषेतच उत्तर दिले तरच निभाव लागतो. "लातों के भुत बातोंसे नही मानते". अन्यथा अन्याय-अपमान, लुटालूट ठरलेली.

या विरुद्ध हवा सर्जिकल स्ट्राईक : देशाला समस्यारूपी महाकाय अजगराने अगदी करकचून वेढा घातलाय, त्याने आवळल्यामुळे देशाचा श्वास अक्षरशः गुदमरतोय. मात्र देश गिळायच्या आत भ्रष्ट राजकारणी, बाहुबली, धनाढ्य, धर्मांध, स्वकीय तसेच साम्राज्यविस्तारवादी परकीय शक्तींरुपी अजगराला कंठस्नान घालण्यासाठी एक निर्णायक 'सर्जिकल स्ट्राईक' करण्याची नितांत गरज आहे. तर आणि तरच या समस्यांच्या मुळाशी लागलेल्या भिषण रोगावर हा घातक सर्जिकल स्ट्राईक एक 'रामबाण' उपाय ठरू शकतो, असे मला वाटते.

- ॲड. उमेश अनपट, (मुख्य संपादक, MBP Live24 आणि कायदेतज्ञ)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !