अहमदनगर - केरळमधील वायनाड जिल्ह्यात अतिवृष्टी व भुस्सलखनामुळे तीन गावे नकाशावरून गायब झाली. हजारावर नागरिक मृत्यूमुखी पडले. शेकडो बालके आई- वडिलांवाचून अनाथ झाली. अनेकांना कायमचे अंपगत्व आले. दहा हजारावर नागरिकांना कायमचे स्थलांतर करावे लागले.
पण युवान या स्वयंसेवी संस्थेमार्फत अडचणीतील देशबांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला. हृदय हेलावणाऱ्या अशा परिस्थितीत मदत शिबीरांतील शेकडो नागरिक आणि भयग्रस्त बालकांपर्यंत केवळ ६ दिवसांत तातडीची मदत युवानमार्फत पोहचविण्यात आली.
टिम युवानने तेथील स्थानिक प्रशासन आणि लष्करी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून गरजेनुसार पुढील आवश्यक मदतीचे नियोजन केले. परतण्यासाठी घरेच नसल्याने तब्बल महिनाभर आपत्तीग्रस्तांना सरकारी मदत शिबिरांत रहावे लागले.
सरकारने घरभाडे देऊ केल्यावर नागरिकांनी विविध सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू केले आहे. परतणाऱ्या नागरिकांना आयुष्याची नव्याने सुरवात करणे सोईचे जावे, यासाठी टिम युवानने पुढाकार घेतला.
युवानच्या मदत कार्याची दखल घेऊन झोमॅटो या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमातून सहयोगाची तयारी दर्शविली. तब्बल एक हजार कुटूंबांना १५ दिवस पुरेल इतका शिधा देण्यात आला.
सोबतच रोगराईपासून वाचण्यासाठी पाणी शुद्धीकरणाची औषधे, बिस्किटे आदी साहित्य कोझीकोड या वायनाडपासून जवळच्या शहरात टिम युवानकडे सुपर्द करण्यात आले.
वायनाड येथील दुर्गम डोंगराळ भागातील स्थलांतरीत नागरिकांपर्यंत साहित्य पोहचविण्याचे मोठे आव्हान टिम युवान समोर होते. परंतू संदिप कुसळकर यांच्या नेतृत्वाखालील टिम युवानने ते नुकतेच लिलया पार केले.
वायनाड येथे अद्याप मुसळधार पाऊस पडत असल्याने मदत साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी युवानला मध्यवर्ती भागात जागेची आवश्यकता होती. कालपेट्टा येथील स्थानिक चर्चने त्यासाठी युवानला मोफत जागा उपलब्ध केली. गरजुंपर्यंत साहित्य वाटपासाठी राष्ट्रीय युवा योजना आणि एम.एल.ए. केअर या स्थानिक सहयोगी संस्थांची मदत झाली.
केरळमधील सर्वाधिक मोठ्या ओनम या सणाकाळात ही मदत पोहचल्याने आपत्तीग्रस्त नागरिकांनी यावेळी मोठे समाधान व्यक्त केले. नैसर्गिक आपत्तीकाळात यापूर्वी देखील तामिळनाडू, केरळ आणि अलीकडे कोल्हापूर, महाड येथे युवानमार्फत प्रभावी मदतकार्य राबवलेले आहे.