महाराष्ट्रात शेतकऱ्यांना बळीराजा म्हटले जाते. हा शेतातील सुगीचा काळ असल्याने या काळात भारतीयांचा प्रेरणा पुरुष याची आठवण काढणे स्वाभाविक आहे. त्याचे मूळचे स्वरूप बळीराजाला आणि शेती केन्द्रस्थानी ठेवून निश्चित करण्यात आले आहे.
बळीराजा अत्यंत पराक्रमी, प्रजाहितदक्ष, कृषीतज्ञ होता. बळीराजाच्या राज्यात सर्व प्रजा अत्यंत सुखी आणि समाधानी होती. बळीराजा सर्व प्रजेला समान वाटणी देणारा... मोठा सम्राट होताच पण त्याबरोबरच तो तत्ववेत्ताही होता.
म्हणून आजही, 'इडापिडा टळो बळीचे राज्य येवो' असे म्हणतात. याच्या दारातून कोणीही विन्मुख जात नसे. पण कोणत्याही चांगल्या गुणाचा अतिरेक झाला की ते वाईटच ना.? त्याचे सत्व पहाण्यासाठी विष्णू वामनरुपात येऊन तीन पावलांचे दान मागितले, बळीराजाने परिणामांची पर्वा न करता हे दान देऊन टाकले.
पहिल्या पावलात अंतरिक्ष, दुसऱ्या पावलात अखंड पृथ्वी अधिग्रहित केल्यानंतर बळीराजाला विष्णूने विचारले की तिसरे पाऊल कुठे ठेऊ.? बळीराजाने अत्यंत विनम्रपणे माझ्या मस्तकावर असे उत्तर दिले. मस्तकावर पाय दिल्यावर बळी पाताळात गेला.
त्याच्या दानशूरपणावर प्रसन्न होऊन त्याला सप्तपाताळाचे राज्य दिले. तुझी अखेरची इच्छा काय आहे असं विष्णूने विचारल्यावर बळीराजा म्हणाला, माझं पृथ्वीवरील राज्य तर तू घेतलंस पण वर्षातील तीन दिवस तरी माझं राज्य धरतीवर असावे.
म्हणून आश्विन शुद्ध चतुर्दशी (नरकचतुर्दशी) आश्विन अमावास्या (लक्ष्मी पूजन) कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) याला बळीराज्य असेही म्हणतात. बळीराजाचा हा समर्पण भाव पाहून विष्णू वामन रुपात त्याच्या दारी द्वारपाल म्हणून उभे राहिले.
त्यावेळी प्रस्थापित वर्गाने बहुजनांच्या राजाला कपटनितीने पाताळात गाडले, तेव्हापासून आजतागायत शेतकरी कर्जाच्या पाताळात गाडलेलाच आहे. राज्य कुठलंही येऊ दे, पण त्याला युगानुयुगे न्याय मिळाला नाही, मिळेल याची शाश्वती नाही.
महात्मा फुले, संत तुकोबाराय यांनी बळीराजाचा सन्मान करणारे अभंग, कविता लिहिल्या, पण शेतकऱ्यांना वाली नाही हेच खरे. आपल्या नव्या हिंदू संवत्सराची सुरवात आजच होत असते. हा पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने व्यापारी त्यांच्या रोजमेळ, हिशोब वह्या, चोपड्यांची पूजा आज करतात.
शेतकरी धान्य साठवणीची तयारी आजच करतात. असा हा पाडवा.. काहीही दंतकथा असोत पण शेतकऱ्यांना जोवर न्याय मिळत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही, हेच खरं.! कर्जमाफी योजना हा उपाय नाही शेतकऱ्यांना मोफत उत्कृष्ट बियाणे, खत, जोडधंद्यांना प्रोत्साहन या गोष्टी अमलात आल्या पाहिजेत.असो.
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)
(भारतीय सण, पर्यावरण, पदार्थ या पुस्तकातून साभार)