आज दिवाळीचा शेवटचा दिवस, कार्तिक शुद्ध द्वितीया. बहिण भावाच्या हळव्या अतूट नात्याला आणखी घट्ट करून नवा बहार आणणारा. या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. कारण, द्वितीयेच्या आकर्षक आणि वर्धमानता दाखविणाऱ्या चंद्रकोरीप्रमाणे बंधू प्रेमाचे वर्धन होत राहो' ही त्या मागची भावना..!
यमी अर्थात यमुना आणि बंधू मृत्यू देवता यम यांच्या प्रेमाची आठवण म्हणून हा सण साजरा करतात. आजच्या दिवशी यमी म्हणजे यमुनेने यमराजांना अगत्याने आपल्या घरी भोजनास बोलावले, भावाचे औक्षण केले. सुग्रास भोजन झाले.
यमुना 'आजतरी बहिण भावाच्या नात्यासाठी तुझे यमपाश सैल कर, अशी याचना करते, अशी दंतकथा आहे. 'म्हणूनही या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. तिन्ही सांजेला द्वितीयेच्या चंद्रकोरी प्रमाणे बहिण भावाच्या प्रेमातील जिव्हाळा वाढत राहावा, म्हणून स्त्रिया आधी चंद्राला ओवाळतात. नंतर भावाचे औक्षण करतात.
आता महत्त्वाचे. जिजी काय सांगतेय म्हणाल, पण हे तुमच्या, माझ्यासाठी फारच महत्त्वाचे आहे, आपल्या बहुजनांच्या संस्कृतीच्या विकासामध्ये यमाची बहिण यमुना, यमी, यमाई हिचा मोठा हातभार आहे.
यमुनाने शेती सिंचन व्यवस्थेचा शोध लावून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली होती. तिच्या या शोधामुळे तिच्या स्मरणार्थ भारतातील सर्वात मोठी सिंचन व्यवस्था ज्या नदीवर अवलंबून आहे त्या नदीला यमुना हे नाव देण्यात आले आहे.
बघा मुलींनो हे आपल्याला किती अभिमानास्पद आहे. आता सिंचन घोटाळे होत रहातात, चौकशीचे फार्सही होतात. पण शेतकऱ्यांना उपयोगी पडणारे संशोधन मात्र होत नाही. असो.
दिवाळी म्हणजे दिव्यांच्या असंख्य ओळी.. हा सण एकमेकांना भेटण्याचा, स्नेह वृद्धिंगत करण्याचा.. सर्वांच्याच आयुष्यात सुखसमाधान येऊ दे. सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी. पण समाधान तर एकसारखेच ना.!
प्रत्येकाला हवा तो स्वप्नदिवा आयुष्यात समाधान घेऊन येऊ दे. दिवे एकमेकांना जोडून जीवन प्रकाशमय होते, रांगोळी च्या ठिपके जोडत जोडत सुंदर कलाकृती तयार होते. अगदी आपल्या आयुष्यासारखं हळूहळू माणसं, नाती जुळत जातात.
कधी मनाजोगे रंग भरले जातात कधी एखादा ठिपका चुकतो.. कधी रेषाही येत नाहीत मनासारख्या. पण म्हणून सारीच रांगोळी पुसासची नाही, करता येईल तेवढं अंगण रेखीव करायचं.
अभ्यंग स्नानासारखे शुचिर्भूत पवित्र करायचे हे एकमेकांच्या, स्नेही जनांच्या सहवासाचे क्षण.. दिव्यांच्या या ओळीत प्रकाशमान करायचे हे दुर्मिळ क्षण. कारण कल हो ना हो... लेकीन आज तो है.! शुभास्ते पंथान संतु.
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)
(भारतीय सण, पर्यावरण आणि पदार्थ
या माझ्या पुस्तकातून साभार)