अशी आहे माय, माझी माय, तुझी माय.!


'पैली माझी ओवी ग मायला वाहिली,
तिच माझी गुरु हाय पैली..'
होय ना.? ही पहिली गुरु, किती धडे देते, त्या शिदोरीवर.. सगळे लाड, छंद, हट्ट पुरवते.


आई तरी माझ्या सरळ रेशमी केसांची इतकी काळजी घ्यायची. माझे केस म्हणजे नातेवाईक, मैत्रीणी यांच्यात कौतुक असायचं. लांबसडक केस पेडीदार वेणी, आईनं केली निगुतीने निगराणी..

अगदी जड व्हायची
मला माझी वेणी,
जीवाला जडभारी
वारीला देत ऊस
मायच्या सायासाने
धरणी लोळती केस.

अशा प्रत्येक माहेरवाशीणीच्या आठवणी असतील ना..? कौतुक तरी किती असते लेकीचे..

'हात भरला काकणाने,
मागेपुढे बिलवर
मायमाऊली माझी
हौस तुझ्या जीवावर.!

यासाठी ती स्वतः लंकेची पार्वती होते अगदी आनंदाने.

जा जा पाखरा,
सय मला मायची मला आली..
माझ्या माहेरात समईसारखी
माय माझी तेवली

प्रत्येक घरातील माय जणू समई असते. आपल्या मायेच्या ज्योतीने घरादाराला उब देत राहते.. मायचं सासर जरी काट्याकुट्याचं असलं, तरी सासरची ओढ, मायने लेकीला शिकविली. लेकीच्या माहेरासांठी माय काट्यात नांदली...!

हे माय का करत असते, आपण असेपर्यंत लेकीला माहेर असावे यासाठी ती सारे सहन करत रहाते. तशी तिची माया कुठल्याही संकटावर मात करणारी.. 'माऊलीची माया सर्व्या बाळांवरी चिमणी खोपा करी अवघड झाडावरी'

लेक लग्न होऊन दूर जाते. पण तिचं मन माहेरात घोटाळत असतं. मायबाप सोडून आलेला प्रत्येक जीव असाच मन माहेरी ठेवून सासरी रमवत असतो. जगरहाटी स्त्री किती सहज स्विकारते ना..? आई म्हणजे तिचं सुखनिधान असतं.

हजार माणसांच्या बदल्यात आई थोर वाटते.
हजार माणसं जणू झाडीचा झाडपाला
माय माझी जणू चिंचेच्या सावलीला
कधी तिला वाटतं अन् ते खरही असतं,
मायसारखी माया येत नाही कुणाला
वृक्षाच फुल येत का कधी शेराला?

मग दिवस सरत जातात लेकही सासरी रमते..
भाच्याच्या बारशाचं कारण
मन येई उंचबळू
माय धाडते बंधू माझा कूळ
मग लेक माह्यराला पोहचते...
माय लेकीच गुज वरषाला गेलं
लेकी मला भेटल्याविना
तुला कसं करमलं?

एकमेकींच्या जीवाभावाच्या गप्पा रंगतात.. लेकीचं सुखदुःख ऐकताना.. 'मायलेकीचं गुज सरना रातीची पूर्वेला उगवली चांदणी ही शुक्राची'

म्हणजे पहाटेची शुक्र चांदणी दिसेपर्यंत मायलेकीच्या गुजगोष्टी चालू रहातात. अशी असते माय.. ठराविक वयानंतर मायलेकी मैत्रिणी होऊन जातात.

खरंतर आईवडील असेपर्यंत माहेर असते, 'माय आहे तोवर माहेर, बाप आहे तोवर मौजा.. भाऊने घेतले जरी लुगडे, तरी तो उपकाराचा सौदा.. अशी आहे माय, माझी माय, तुझी माय.!' अन् जितकी आहे सर्वांच्या मनात एक माय.

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !