येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
नाशिक : राज्यातील पोलीस विभागातील कार्यालयीन कर्मचारी वर्गाच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाकडे सतत लेखी पाठपुरावा करून देखील कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी धुमसणाऱ्या असंतोषाकडे, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी "काळे कपडे परिधान" आंदोलन गुरुवारी, 27 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.
दरम्यान संघटनेच्या चार पत्रांद्वारे आम्ही आमची कैफीयत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यासंदर्भात चर्चेची कवाडे उघडून, संघटनेसह अद्याप कोणत्याही स्वरुपाची सकारात्मक चर्चा संपन्न होऊ शकलेली नाही, हे दुर्दैवी वास्तव आहे.
चर्चेची संधी हिरावली : पोलीस महासंचालक स्तरावर, आमच्या प्रलंबित मागण्यांच्या सनदेवर चर्चेच्या माध्यमातून बऱ्याचशा समस्यांचे निराकरण होईल, अशी आमची धारणा आहे. त्यासाठी आम्हांला चर्चेसाठी संधी मिळावी यासाठी आम्ही करीत असलेल्या सततच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही.
विलंबामुळे असंतोष प्रशासन आमच्या जिव्हाळयाच्या रास्त मागण्यांवर योग्य निर्णय घेण्यास्तव अनाकलनीय विलंब लावीत आहे, अशी भावना सर्वदूर महाराष्ट्रातील कार्यालयीन पोलीस कर्मचारी बंधू-भगिनीमध्ये पसरली आहे. या असंतोषाकडे प्रशासनाचा लक्षवेध करुन घेण्यास्तव गुरुवार दि.२७ फेब्रवारी, २०२५ रोजी राज्यातील सर्व पोलीस कार्यालयीन कर्मचारी, "काळे कपडे परिधान" करुन लोकशाही मार्गाने लक्षवेध आंदोलन छेडणार आहेत.
मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनाही साकडे : आंदोलनासाठी आंदोलन करणे हे आमच्या संघटना-विचारात बसत नाही असा आमचा इतिहास आहे. प्रशासनाने पुढाकार घेऊन, राज्य कर्मचाऱ्यांमधील एका महत्वाच्या कर्मचारी घटक समुहाला, प्रलंबित मागण्यांबाबत योग्य निर्णय घेऊन समस्त कर्मचारी वर्गास दिलासा द्यावा, नव्हे तो आपण द्यालच, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना हे विविध 33 मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
कार्यालय प्रमुखांना देणार निवेदन दि. २७ फेब्रुवारीला आंदोलनादिवशी सर्व कर्मचारी संपूर्ण वेळ काळे कपडे परिधान करून काम करणार आहेत. सकाळी ११.३० वाजता सामूहिक स्वरूपात आपल्या मागण्यांचे निवेदन पोलिस महासंचालकांच्या नावे लेखी स्वरूपात प्रत्येक घटक कार्यालयाच्या प्रमुखांकडे देणार आहेत.
मागण्यांचे फलक दाखविणार : जेवणाच्या वेळेत कार्यालयाच्या बाहेर मोक्याच्या ठिकाणी एकत्र येऊन मागण्यांचे फलक दर्शविण्यात येणार आहेत. हे आंदोलन एक सुरुवात असून केवळ लक्ष वेधण्यासाठी असल्याने कोणीही घोषणाबाजी करणार नाहीत, असा सबुरीचा सल्लाही निवेदनात देण्यात आलेला आहे.