'या'निमित्ताने पुन्हा समोर आलेला ‘सामाजिक अंधार’ कसा दूर करणार?

येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा

स्वारगेट बसस्थानकातील घटनेला आरोपीची गुन्हेगारी वृत्ती जशी जबाबदार आहे, तशीच यंत्रणेची निष्क्रीयता आणि सामाजिक अनास्थाही तेवढीच जबाबदार आहे. अंधाराचा गैरफायदा उठवत आरोपीने हे कृत्य केल्याने उद्यापासून कदाचित सर्व बसस्थानकांवर लख्ख प्रकाशाची सोय केली जाऊ शकते. मात्र, यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आलेला ‘सामाजिक अंधार’ कसा दूर करणार?

या घटनेचा अन्य तपशील आणि अन्य घटकांवर बोलून झाले आहे. आता थोड्या वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करू. आरोपी या तरुणीला सुरवातीला त्या बसकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असताना तेथे आणखी एक प्रवासी होता. त्या दोघांचे बोलणे सुरू असताना तो उठून जाताना दिसतोय.

घटना घडल्यानंतर जेव्हा ती तरुणी बसमधून बाहेर पडते, तेव्हा तिला आणखी एक प्रवासी दिसतो. त्याला ती घटनेबद्दल सांगते. त्यावर तिचे म्हणने असे की, त्या माणसाने तिला या वाईट लोकांच्या नादी लागू नको आपल्या घरी जा, असा सल्ला दिला.

जर हाच व्यक्ती तिला बसस्थानकातील नियंत्रण कक्षात, सुरक्षा कक्षात घेऊन गेला असता किंवा मला वेळ नाही, तू दुसऱ्या कोणाला तरी सांग, पोलिसांना सांग, चौकशी खिडकीत जा, असे काही म्हटला असता तरी यंत्रणा हलण्यास कदाचित सुरवात झाली असते.

मात्र, धक्क्यातून सावरल्या सावरल्या बाहेरच्या जगाचा हा नकारात्मक अनुभव आणि आपणच कसे फसलो, ही अपराधीपणाची भावना त्या तरुणीला घराकडे निघून जाण्यास भाग पाडली असावी. पुढे तिच्या मित्राच्या सल्ल्यामुळे अर्ध्या वाटेतून ती तक्रारी देण्यासाठी परत आली. या मधल्या काळात आरोपीला पळून जाण्यास पुरेपूर संधी मिळाली.

असे का व्हावे? : यंत्रणेबद्दलचा नकारात्मक भाव याला कारण असतो. तक्रारी करून काही होत नाही, आपण त्या भानगडीत पडायला नको, असा विचार करून माणसे मोकळी होतात. यातून जो सामाजिक अंधार निर्माण होतो, त्यातून आरोपींचे धाडस वाढत जाते. यंत्रणेबद्दलची ही नकारात्मक भावना अनेक घटनांमधून पुढे आलेली असते, कधी जास्त वाढवून सांगितलेली असते, सतत अपप्रचार झालेला असतो.

यातून एकूणच समाजाचे हे मत बनलेले असते आणि ते सरसकट सर्वत्र वापरले जाते. हे चित्र बदलण्यासाठी केवळ यंत्रणा क्रियाशील होऊन चालणार नाही, तर नागरिकांच्या गळी विश्वास उतरवून ही नकारात्मक भावना दूर करावी लागेल. आणि हो, यासाठी नागरिकांनाही पुढाकार घेतला पाहिजे.

आपलीही थोडीफार जबाबदारी आहेच, अशा घटनांच्यावेळी थोडा धोका पत्कारून सजग नागरिक म्हणून मदत करण्यास काय हरकत आहे? अशा संतापजनक गुन्ह्यातील आरोपीची माहिती देण्यासाठी पोलिसांना १ लाखाचे बक्षीस जाहीर करावे लागते. म्हणजे सामाजिक जबाबदारी नव्हे, तर पैशासाठी तरी लोक माहिती देतील, असे पोलिसांना वाटत असावे.

आता मंत्री-पदाधिकारी कसे बोलतात पहा. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी या घटनेवर पोस्ट करताना त्या तरुणीचीही चूक असल्याकडे बोट दाखविली आहे. त्यांच्या मते ही तरुणी अनोखळी व्यक्तीवर विश्वास ठेवून गेलीच कशी? काहींना वाटते तिला पालकांनी एकटी का सोडली? गृहराज्यमंत्री म्हणतात, तिने काहीच विरोध केला नाही, विरोध केला असताना दहा-पंधरा लोक तेथे होते, ते मदतीला आले असते…. वगैरे.

घटनास्थळावरील परिस्थितीत, त्यावेळची तिची मनस्थिती यांचा सखोल विचार केला, तर अशी विधाने होणार नाहीत. कोणत्याही हत्याराचा वापर न करता केवळ बोलण्यात गुंतवून गुन्हे करणारे सराईत गुन्हेगारी कित्येक आहेत. भल्या भल्यांना त्यांनी फसविल्याचे अनेक गुन्हे घडतात.

साधे उदाहरण घेऊ. पुढे पोलिसांची नाकेबंदी सुरू आहे असे सांगून किंवा आम्हीच पोलिस असल्याचे सांगून रस्त्याने जाणाऱ्यांना लुबाडण्याचे गुन्हे असो की खोटे सांगून अगदी आयटी इंजिनिअरला गंडा घालणारे सायबर चोरटे असो. चाकू, सुरा, बंदूक असे कोणतेही हत्यार न वापरता केवळ शब्दांत अडकवून ते गुन्हे करतात. हाही तसाच प्रकार.

आणखी एक पहा, जेव्हा अत्याचारानंतर खून होतो, तेव्हा अशीच काही मंडळी म्हणतात की मुलीने विरोध केला नसता तर तिचा जीव वाचला असता. विरोध केल्याने आरोपी आक्रमक झाला. आणि या घटनेत म्हणतात विरोध का केला नाही? विरोध केला असता तरी वाचली असती.

असो, प्रत्येकाला बोलण्याचा, मते व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण किमान पदावरील व्यक्तींनी मत व्यक्त करताना सारासार विचार केला पाहिजे. अन्यथा तीही एक काळी बाजू ठरून या सामाजिक अंधारात आणखी भर पडते.

- विजयसिंह होलम यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !