मला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहायला आवडते. कारण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया वाचता येतात. मुंबई महापालिकेचे चतुर्थ श्रेणी कामगार रात्रशाळेत जाऊन पास होतात. तुम्हाला वाटेल साधीच तर कथा आहे.
शिवराज वायचळ या दिग्दर्शकाचा पहिला चित्रपट आहे म्हणे हा. सत्यकथेवर आधारित आहे. एका नेक शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांनी उन्नत व्हावे म्हणून केलेल्या घडपडीची गोष्ट आहे.
आजूबाजूचे जग वेगळे आहे ते आपल्याला माहित नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात गुंतागुंत आहे. मी इथे तुम्हाला चित्रपटाची कथा अजिबात सांगणार नाही. इथे जग वेगळे आहे, कठोर आहे. पण जगात छोटे छोटे पण भले लोक आहेत.
ते काहीतरी करून बघतायत माणसाशी माणसाने चांगलं वागावे, जगात काही करायला बरं करायला धडपडावं, स्वतः बरोबर दुसऱ्यांनाही उन्नत करावं, अशी मूल्य चुकत माकत जपत आहेत.
जगाचा गुंता समजून घेताना मुल्य जपायला हवीत ना.. जी माणसं नेक असतात ती ही मुल्य जपायला धडपडत असतात. हा चित्रपट या 'जपायला हवीत' त्या मुल्यांचा बद्दलचा हा चित्रपट आहे.
सत्यकथेवर आधारित असला तरी या कथेला कुठेही नाटकीय न करता, त्या गोष्टींच्या चढउतारासकट साधेपणानं पण त्या साधेपणाला धक्का न लावताही गोष्ट दिग्दर्शक आपल्याला सांगतो.
'कशासाठी शिकायचं? त्याचा फायदा काय? असा प्रश्न आजही कित्येक सुशिक्षित (?) विचारतात. तरीही सांगावसे वाटते, माणुसकी, ध्येयवाद, उच्च विचारसरणी, शिक्षणाचं महत्त्व हे आपल्या आतमध्ये सतत जागं करायला हवे.
जपायला हवं आणि आपण ते जपू शकतो. कारण तेच आपल्या जगण्याचा मूलाधार आहे. हा चित्रपट ध्येयवाद खरा करायला शिकवतो. यात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यासारख्या बाप माणसांसमोर ओम भुतकर विशेष वाटला.
साऱ्यांनी खूप सुरेख अभिनय केला आहे. जगण्यातील आनंद शोधायचा आहे ना मग जरुर पहा. मराठी चित्रपट जगला पाहिजे असं खरोखरच वाटत असेल तर असे आशयगर्भ चित्रपट निर्माण व्हायला हवेत आणि आपण ते पहायला हवेत. 'आता थांबायचे नाही'.
- स्वप्नजादेवी घाटगे (कोल्हापूर)