महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर थोडशा थंडावलेल्या समतेच्या चळवळीत प्राण फुंकणारे राजर्षी. सर्व जातीतील शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांचे जाळे उभे करणारे राजर्षी.
आपल्या संस्थानाच्या बाहेर येथेही वसतीगृहे स्थापून सर्वांना सढळ हाताने मदत करणारे राजर्षी. गावकुसाबाहेर असणाऱ्या प्रजेला समतेने प्रतिष्ठेचे आयुष्य देणारे राजर्षी.
अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या घटकांना आपलेसे करणारे राजर्षी. सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना ५०% आरक्षण देणारे आरक्षणाचे जनक राजर्षी. महिलांना शिक्षण, कलेचे ज्ञान देऊन उच्च पदावर नियुक्ती करणारे राजर्षी.
आपल्या लाडक्या पुत्राचे आकस्मित अपघाती निधन झाल्यानंतर साऱ्या वैभवाचा त्याग करून ते अतिशय साधेपणाने रहाणारे राजर्षी.
आपल्या विधवा सून इंदूमती राणीसाहेबांच्या भविष्याच्या चिंतेने व्याकूळ होऊन सुनेच्या भविष्यासाठी आश्रमशाळा उभी करून तिला शिक्षित करणारे पितृतुल्य राजर्षी.
कोल्हापूरला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केशवराव भोसले नाट्यगृह निर्माण करणारे राजर्षी. कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग मैदान उभे करणारे राजर्षी. आजतागायत दिमाखात उभे असलेले राधानगरी धरण निर्माण करणारे राजर्षी.
समाजात दलित, महिला, भटके आदिवर्ग वर्षानुवर्षे पिळवणूकीचे साधन मानले गेले आहेत. त्याकाळी तर या घटकांची अवस्था आणखीनच बिकट होती. या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारे राजर्षी.
महिलांच्या विकासासाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा, काडीमोड प्रथा, पुनर्विवाह, देवदासी पुनर्वसन कायदा, आंतरजातीय विवाह कायदा, मोफत शिक्षण, शिमग्याला देण्यात येणाऱ्या शिव्या बंद करण्याचा कायदा, असे महत्त्वाचे कायदे करुन स्त्रीला जगण्याचा अधिकार देणारे राजर्षी.
नुसते सिंहासनाधिष्ठ झाले नाहीत तर आपल्या क्रांतिकारी विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणून समाजात स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारे राजर्षी. अर्थात हे सारं करताना प्रचंड विरोधाला शांतपणे सामोरे जाणारे राजर्षी.
किती मोठे कार्य आहे हे किती तरी ग्रंथकारांनी आपआपल्या ग्रंथात मांडले आहे. पण राजर्षी शाहू महाराज हे व्यक्तिमत्त्व असं थोडक्यात सांगायचे नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास म्हणजे आकाशाला कवेत घेण्यासारखे आहे.
आज राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतिदिन. राजर्षींना जाऊन ९८ वर्ष झाली पण महाराष्ट्राच्या सुजनांच्या मनामनात अजूनही महाराज विचारातून जिवंत आहेत. कारण जे शुभ आहे, जे मंगल आहे, त्यांना मृत्यू कधीच संपवू शकत नाही.
महाराष्ट्र आहे तोपर्यंत शिवशंभू शाहू फुले आंबेडकर हे विचार जिवंत रहातील. आदरणीय राजर्षींना स्मृती दिनानिमित्त सखी संपदा परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन.
- स्वप्नजादेवी घाटगे (कोल्हापूर)