अहिल्यानगर - आंतरराष्ट्रीय कामगार दिवस दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी, त्यांच्या संघर्षांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांचे योगदान मान्य करण्यासाठी साजरा केला जातो.
कामाचा सन्मान करा आणि कामगारांचा आदर करा हा या दिवसाचा मुख्य संदेश आहे. कष्टकरी गुणवंत कामगारांचे कौतुक होणे आवश्यक आहे, हे विचारात घेऊन आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून यावर्षी पासून जाणीव फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत कामगार पुरस्कार देण्याचे नियोजन केले होते.
यासाठी पात्र गुणवंत कामगारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परीक्षण करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील ५ प्रतिष्ठितांची कमिटी नेमण्यात आली होती. नगर जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रातून आलेल्या २९ अर्जांमधून २ पात्र कामगारांची विशेष निकषांवर गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच नगरमध्ये कायनेटिक इंजिनीअरिंग या कंपनीच्या सभागृहामध्ये पार पडला. या कार्यक्रमात गुणवंत कामगार पुरस्कार श्री तुकाराम काळे , कमिन्स कंपनी व किशोर वाघ, कायनेटिक कंपनी यांना प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी राजपाल शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
विशेष म्हणजे सोबतच गुणवंत कामगारांच्या गृहलक्ष्मींचाही विशेष गौरव म्हणून त्यांच्यासाठीही मौल्यवान गृहोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. अध्यक्षीय भाषणात राजपाल शर्मा यांनी जाणीव फाऊंडेशन गेल्या १० वर्षांपासून करत असलेल्या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केले.
आपण सगळे जण स्वतःसाठी काम तर करतोच आहोत पण प्रत्येकाने समाजासाठीही काम करणे आवश्यक आहे, असेही ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम येथील आतंकी हल्ल्यात शहीद झालेले पर्यटक तसेच युद्धात शाहिद झालेल्या वीर जवानांना जाणीव फाऊंडेशन व कायनेटिक कंपनीने श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी कायनेटिकचे वरिष्ठ मनुष्यबळ महाव्यवस्थापक शशिकांत गुळवे, सुरेश जाधव, सुनील मुंडलीक, जाणीव फाऊंडेशनचे प्रदीप वाखुरे, राहुल जोशी, ॲड. विक्रम वाडेकर नोटरी पब्लिक व विश्वस्त जगदंबा देवी ट्रस्ट, मोहटादेवी व ॲड व इंजिनीयर कैलाश दिघे आदी उपस्थित होते.
या कौतुक सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामगार व कर्मचारी उपस्थित होते. या सोहळ्यासाठी कायनेटिक कंपनी कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.