अहिल्यानगर - नगरच्या मातीतील उत्कृष्ट अभिनेत्री वैष्णवी संजय घोडके यांना नुकत्याच पार पडलेल्या यशवंत शॉर्ट फिल्म फेस्टिवलमधे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई तर्फे घेण्यात येणारा ' यशवंत शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2025' नुकताच मुंबईत पार पडला. या महोत्सवाचे हे पहिलेच वर्ष होते. या लघुपट महोत्सवात संपूर्ण देशभरातून 100 पेक्षा जास्त लघुपट आले होते.
त्यामधून वैष्णवी हिने प्रमुख भूमिका केलेल्या ' we, The Puffcorns of India' (आम्ही, भारताचे मुरकुल) या लघुपटाला 'सर्वोत्कृष्ट लघुपट ' हा पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याबरोबरच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार आदित्य मुंगडे आणि वैष्णवी संजय घोडके यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार याच लघुपटासाठी देऊन सन्मानित करण्यात आले.
या शॉर्टफिल्म फेस्टिवलमधे परीक्षक म्हणून प्रसिद्ध छायाचित्रकार, लेखक दिग्दर्शक महेश लिमये, पटकथा लेखिका मनीषा कोरडे आणि लेखक आणि समीक्षक गणेश मतकरी यांनी काम पाहिले.
याच लघुपटासाठी वैष्णवी हिला सातव्या अण्णाभाऊ साठे लघुपट महोत्सव, पुणे मधे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. आपल्या नगरचे नाव मोठे करणाऱ्या वैष्णवी या गुणी अभिनेत्रीने तिचा कला क्षेत्रातला प्रवास एकांकिका, राज्य नाट्य स्पर्धापासून सुरू केला.
पेमराज सारडा महाविद्यालया तर्फे विविध एकांकिका स्पर्धामधे परितोषिके पटकावत आज ती लघुपट, मराठी मालिका आणि सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत नगरचे नाव मोठे करत आहे.
वैष्णवी हिने पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र येथून नाट्यशास्त्र या विषयात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. घरची कोणतीही पार्श्वभूमी नसताना 'निर्मिती रंगमंच' या नाट्यसंस्थेमार्फत 'वारुळातली मुंगी', 'कोंडवाडा', 'ड्रायव्हर', 'हिय्या', 'रक्तोत्सव', अशा अनेक पारितोषिक प्राप्त एकांकिकांमधे तिने काम केले.
या एकांकिकेतील अभिनयाची अनेकांनी प्रशंसा केली. तसेच वामन केंद्रे दिग्दर्शित 'गजब तिची अदा' या व्यावसायिक नाटकात तिने काम केले आहे. वैष्णवी हिने या आधी 'धोंडी', 'मिसेस श्रीमती अंबरेला', 'विद्यापीठ', 'सजणा', 'सोहळा', या सिनेमात भूमिका केलेल्या आहेत.
तसेच 'तुझं माझं जमतंय', 'घेतला वसा टाकू नको', 'दार उघड बये', 'सोन्याची पावलं' या टेलिव्हिजन मालिकांमध्ये प्रमुख भूमिका केलेल्या आहेत. सध्या 'सन मराठी' वाहिनीवर सुरू असलेल्या 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत त्या प्रमुख भूमिकेत काम करत आहेत.