अहिल्यानगर - जिल्हा पोलिस दलातील दिगंबर रावसाहेब कारखेले, मल्लिकार्जुन कैलास बनकर, गणेश रामदास चव्हाण, खलील अहमद दाऊद शेख, कृष्णा नाना कुर्हे आणि प्रमोद मोहनराव सांगळे यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले.
महाराष्ट्र दिनी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार्या समारंभात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते हे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर हे येथील सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांनी सायबर गुन्ह्यांच्या तपासात मोलाची कामगिरी केली आहे. गणेश चव्हाण हे अहिल्यानगर शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात नेमणुकीस आहेत.
राज्यात पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करणार्या राज्यातील ८०० पोलिस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन महाराष्ट्र दिनी गौरविण्यात येणार आहे.
अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलात कार्यरत असणार्या ६ पोलिस अंमलदारांचा त्यात समावेश आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुल्का यांनी सोमवारी (२८ एप्रिल) ही यादी जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.
पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्राप्त करणे हा एक मोठा मान समजला जातो. पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांची मेहनत, निष्ठा आणि कर्तव्यनिष्ठेला हा सन्मान मिळाला आहे. या पोलिस अंमलदारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.