भेंडा (अहिल्यानगर) – ऊस उत्पादक शेतकरी समाधानी आणि कामगार सुरक्षित राहावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले माजी आमदार नरेंद्र घुले पाटील हे अभ्यासू आणि अष्टावधानी नेतृत्व असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार यांनी केले.
भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या अध्यक्ष माजी आ. नरेंद्र घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
पवार यांनी सांगितले की, बदलत्या काळातील आव्हानांवर मात करून घुले बंधूंनी उद्योग समूह यशस्वीरित्या पुढे नेला आहे. राज्यात अनेक सहकारी साखर कारखाने खाजगी झाले असताना, ज्ञानेश्वर कारखाना मात्र शेतकरी व कामगारांच्या हितासाठी कार्यरत आहे.
सत्काराला उत्तर देताना माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी सांगितले की, सहकार ही ग्रामीण भागाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. ज्ञानेश्वर उद्योग समूहामुळे समाजात आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तन घडले.
ऊस भावाबाबत शेतकरी निश्चिंत राहावे, भविष्यात ज्ञानेश्वर कारखाना जिल्ह्यात नंबर एकवर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमात अॅड. देसाई देशमुख, माजी आ. पांडुरंग अभंग, दत्तात्रय काळे, डॉ. शिवाजी शिंदे, बबनराव धस आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी केले, तर सूत्रसंचालन कामगार संचालक सुखदेव फुलारी यांनी केले. आभार सचिव रवींद्र मोटे यांनी मानले.
वृक्षारोपण व रक्तदान शिबिर - माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळी वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 88 रक्तदात्यांनी सहभाग घेतला.