अहिल्यानगर - पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील भारत गॅस गोडाऊनमधील गॅस टाक्यांची चोरी उघडकीस आली असून, या प्रकरणात 9 आरोपींच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरने केलेल्या कारवाईत 130 भरलेल्या गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या असून, त्यांची अंदाजे किंमत 5 लाख 20 हजार रुपये आहे.
दि. 10 जून 2025 रोजी गोडाऊनचे मालक सुनिल बेळगे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दाखल केली होती. पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला.
धाराशीव येथून आरोपी राजेंद्र गुलाब काळे याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने 8 साथीदारांची नावे उघड केली, यामध्ये सुंदर शिंदे, रामा काळे, गुलाब काळे, सुनिल पवार, दत्ता पवार, लगमण पवार, शंकर काळे व माणिक काळे यांचा समावेश आहे.
हे सर्व आरोपी सध्या फरार आहेत. तर गॅस टाक्या राहुल चेडे यांच्या हॉटेलमध्ये ठेवल्याची कबुली आरोपीने दिली. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी 130 गॅस टाक्या जप्त केल्या. पुढील तपास पाथर्डी पोलिस करत आहेत.
तपास पथकातील दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, सुरेश माळी, मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश लोंढे, अरूण गांगुर्डे, भाऊसाहेब काळे, जालींदर माने, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे, सारीका दरेकर, महादेव भांड, आदींनी ही कामगिरी केली.