अहिल्यानगर – जामखेड शहरातील दोन हॉटेलांवर देशी-विदेशी अवैध दारू बाळगल्याच्या आरोपावरून पोलिसांनी छापा टाकून १,२०,४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने १८ जून रोजी केली.
पोलीस अधीक्षक अहिल्यानगर घार्गे यांच्या आदेशानंतर परीविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक जामखेड पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते.
त्यावेळी त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जामखेड येथील हॉटेल पाटील वाडा व हॉटेल साई लॉजिंग येथे परवानगीशिवाय देशी-विदेशी दारूचा साठा करण्यात आलेला आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह हॉटेल पाटील वाडावर छापा टाकला असता किसन सुरेश जरे (रा. मतकुळी, ता. अष्टी, जि. बीड) हा इसम पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी त्याला अटक केली.
त्याच्याकडून २६,९१० रुपयांची देशी-विदेशी दारू व १५,२७० रुपये रोख रक्कम असा एकूण ४२,१८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हॉटेल साई लॉजिंगवर कारवाई करताना दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून ७८,२८५ रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला. दोन्ही ठिकाणांहून मिळून एकूण १,२०,४६५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कामगिरी परीविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने केली आहे.
या पथकात पोसई राजेंद्र वाघ, तसेच शंकर चौधरी, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, भिंगारदिवे, उमेश खेडकर, सुनिल पवार, अजय साठे, अमोल कांबळे, अक्षय भोसले, सुनिल दिघे यांचा समावेश होता.
पोलिसांनी यापुढेही अशा अवैध व्यवसायांविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले असून माहिती देणाऱ्याची नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.