अहिल्यानगर – पूरस्थितीत नागरिकांचे प्राण वाचविणे आणि अपघाताचा बनाव उघडकीस आणून खून प्रकरणात न्याय मिळवून देणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) प्रल्हाद गीते यांच्या कार्याचा गौरव करत महिला वकीलांनी त्यांचा सन्मान केला.
नगर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या गीते यांनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेमुळे आणि माणुसकीच्या भावनेने केलेल्या कार्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. विशेषतः, अपघात दाखवून खून लपवण्याचा प्रयत्न उघडकीस आणत त्यांनी संबंधित कुटुंबाला न्याय मिळवून दिला.
या पार्श्वभूमीवर महिला वकील व महिला बालकल्याण समितीच्या सदस्या ॲड. अनुराधा येवले यांच्या हस्ते गीते यांचा सन्मान करण्यात आला. पुष्पगुच्छ आणि शाल, श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, अनंत कोकरे, जगदीश मुनगीर, समीर बारवकर, ॲड. आरती पोखरणा, ॲड. योगिता कोकरे, ॲड. प्रदीप पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड. येवले म्हणाल्या की, पोलीस यंत्रणा ही समाजाचा तिसरा डोळा असून गीते सरांसारखे अधिकारी ही त्यातील खरी ताकद आहेत. त्यांनी फक्त कायदा अंमलात आणला नाही तर वर्दीत माणुसकी जपणारे अधिकारी म्हणून आदर्श निर्माण केला आहे.