अहिल्यानगर – जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकाऱ्यांना सक्त निर्देश दिले आहेत.
दिनांक १७ जून रोजी घेतलेल्या प्रलंबित गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट निर्देश दिले. पोलीस ठाण्यांमध्ये प्रलंबित सर्व गुन्ह्यांचा योग्य तपास करून वेळेत निकाली काढण्यात यावा. विशेषतः शारीरिक स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी.
अवैध गुटखा, सुगंधी तंबाखू, गोमांस, दारू, गांजा, ड्रग्स, वाळू व गौण खनिज, अवैध हत्यारे, पेट्रोलियम पदार्थ, वाहन चोरी, अनैतिक मानवी तस्करी, ऑनलाइन जुगार यांसारख्या अवैध धंद्यांचे 100 टक्के उच्चाटन करण्याचे आदेश त्यांनी दिले.
ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे अवैध धंदे निदर्शनास येतील, त्या ठिकाणच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलीस अधीक्षक घार्गे यांनी बैठकीत दिला आहे.
ही कारवाई प्रभावीपणे पार पाडण्यासाठी विशेष पथके कार्यरत राहतील. या पथकांनी नियमित छापे टाकून कारवाईचा अहवाल प्रत्येक मासिक गुन्हे आढावा बैठकीत सादर करावा, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट केले की, पोलीस यंत्रणेने समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात स्वतः वैयक्तिक लक्ष घालून कार्यवाही करावी आणि नागरिकांचा पोलीस व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ करावा.