नागपूर – अहिल्यानगर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना, जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचीही मागणी करण्यात आली आहे.
नागपूर येथे १५ जून रोजी अहिल्यानगरच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली. यावेळी वैद्यकीय महाविद्यालय नगर शहरातच व्हावे, असा ठाम आग्रह शिष्टमंडळाने व्यक्त केला.
काही अधिकारी या प्रक्रियेत अडथळे आणत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.
शिष्टमंडळाने सांगितले की, अहिल्यानगर जिल्हा हा राजकीय, सामाजिक व सहकारी चळवळीच्या दृष्टीने मोठा असूनही येथे अद्याप शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झालेले नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर ठिकाणी जावे लागते, जे त्यांच्या आर्थिक क्षमतेपलीकडचे असते. त्यामुळे लवकरात लवकर नगर शहरातच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर व्हावे, अशी मागणी करण्यात आली.
या शिष्टमंडळात भाजपाचे प्रा. भानुदास बेरड, ॲड. अभय आगरकर, जालिंदर वाकचौरे, सचिन पारखी, वसंत लोढा, पंडित वाघमारे, प्रशांत मुथा, आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.