अहिल्यानगर - जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरीत्या डांबवून ठेवण्यात आलेल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरच्या पथकाने केलेल्या कारवाईत ४२ जनावरांची सुटका करण्यात आली.
या कारवाईत तब्बल १ कोटी २ लाख ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
तपास पथकाने दिनांक १७ जून २०२५ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे घोडेगाव येथे छापा टाकला. फिरोज रशीद शेख व पापा कुरेशी यांनी मिळून जनावरांची कत्तलीसाठी डांबवणूक केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली.
घटनास्थळी दोन ट्रकमध्ये जनावरे भरताना व एका टेम्पोत भरलेली स्थितीमध्ये आढळून आली. या कारवाईत निलेश शिंदे (रा. उंबरगाव), शाहरूख शेख (रा. घोडेगाव) व भारत शहाराव (रा. फत्तेपुर) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
पथकाने घटनास्थळावरून ट्रक, टेम्पो, दोन कार्स, अशा विविध वाहने आणि ४२ गोवंशीय जनावरांसह एकूण १ कोटी २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फरार आरोपी फिरोज शेख व पापा कुरेशी यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम तसेच प्राणी क्रौर्य प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुनिल पाटील, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, जिल्ह्यात खळबळ उडवणारी ठरली आहे.