अहिल्यानगर - नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील 'गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज'मध्ये २१ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योगदिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर करून योगाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विष्णू कराळे सर होते. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, क्रीडा शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या सूर्यनमस्कार, ताडासन, भुजंगासन, वज्रासन, त्रिकोणासन, प्राणायाम यांसारखी विविध योगासने सादर केली.
मार्गदर्शन करताना विष्णू कराळे सर म्हणाले, “योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून मानसिक शांती व आत्मिक उन्नतीसाठीही आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी दररोज काही मिनिटे योगाभ्यास केला, तर एकाग्रता वाढून शिक्षणात चांगली प्रगती साधता येते.
शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना योगाचे फायदे समजावून सांगितले. योगामुळे मन शांत राहते, ताणतणाव कमी होतो, शरीर तंदुरुस्त राहते आणि प्रतिकारशक्ती वाढते, हे उदाहरणांसह समजावून देण्यात आले.
या कार्यक्रमाचे संयोजन क्रीडा शिक्षकांनी केले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून योगाबाबतची जागरूकता दाखवली. कार्यक्रमाच्या शेवटी ‘योग करा, निरोगी राहा’ असा संदेश देत संपूर्ण शाळा परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
गुरुकुल स्कूलच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनीही कौतुक केले असून, शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले हे पाऊल निश्चितच स्तुत्य आहे.