अहिल्यानगर – पाथर्डी तालुक्यातील बेकायदा मावा व्यवसायावर पोलिसांनी जोरदार धडक कारवाई करत ४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पाथर्डी तालुक्यातील खरवंडीसह विविध ग्रामीण भागात चालणाऱ्या अवैध मावा व सुगंधित सुपारी विक्रीवर दुपारनंतर पोलिसांनी छापे टाकले.
अचानक झालेल्या धाडीमुळे मावा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. काही विक्रेत्यांनी पथकासोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांनी कठोर इशारा दिला. काहींनी दुकानांना कुलूप लावून पळ काढला.
या कारवाईदरम्यान पथकाने मावा तयार करणाऱ्या यंत्रासह मोठ्या प्रमाणात सुगंधित सुपारी व मावा जप्त केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
या मोहिमेत परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, शकील शेख, शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, दिनेश मोरे, उमेश खेडकर, अजय साठे, मल्लिकार्जुन बनकर आदींचा सहभाग होता.
सायंकाळी शहरातील मुख्य चौकांमध्ये पथकाने पायी गस्त घालून अवैध पार्किंग व टवाळखोरी करणाऱ्या युवकांवर कारवाई केली. या कारवाईचे पाथर्डीतील नागरिकांकडून स्वागत होत आहे.