योगिता सुर्यवंशी-नळे (अहिल्यानगर) – उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांचा बराचसा वेळ चिंतेत व तणावात जातो. याच भावनेला स्पर्श करत, रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी ‘माहेर हॉस्पिटल’ने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे.
रुग्णालयात नुकताच ‘वाचनालय उपक्रम’ सुरु करण्यात आला असून, यामुळे रुग्णालयाच्या वातावरणात सकारात्मकतेची भर पडली आहे. या उपक्रमामागे हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. सोनल शिवराज गुंजाळ आणि सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिवराज गुंजाळ यांची प्रेरणा आहे.
रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या सोबत असलेले नातेवाईक अनेक वेळा वाट पाहण्यात किंवा मानसिक अस्वस्थतेत वेळ घालवत असतात. ही वेळ काही काळ का होईना, पण सत्कारणी लावण्यासाठी वाचन हे प्रभावी माध्यम ठरू शकते, या विचारातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
‘माहेर हॉस्पिटल’मध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांतील दर्जेदार आणि नामवंत लेखकांची विविध प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. कथा, आत्मचरित्रे, वैचारिक लेख, काव्यसंग्रह यांचा समावेश असलेल्या या वाचनालयात कोणताही शुल्क आकारण्यात येत नाही.
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या रुग्णांनाही ही पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. या उपक्रमास रुग्ण आणि नातेवाईकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी या सकारात्मक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे.
मानसिक स्वास्थ्य वृद्धिंगत करणाऱ्या या पावलामुळे ‘माहेर हॉस्पिटल’ने केवळ उपचारच नव्हे, तर मनाला आधार देणारे एक वेगळे कार्य सुरू केले आहे. हा उपक्रम इतर रुग्णालयांसाठीही प्रेरणादायक ठरेल, यात शंका नाही. ‘माहेर हॉस्पिटल’ने दाखवलेली संवेदनशीलता आणि सामाजिक जाणिवा निश्चितच कौतुकास्पद आहेत.