येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
मुंबई - नाफेड व एनसीसीएफमार्फत होणारी कांदा खरेदी शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून, ती काही निवडक संस्थांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केला आहे.
केंद्र सरकार, नाफेड आणि एनसीसीएफच्या प्रमुखांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी ही खरेदी तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. घनवट म्हणाले की, मुल्य स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत महाराष्ट्रातून तीन लाख टन कांदा खरेदी होणार आहे.
मात्र यासंबंधी कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. खरेदी करणाऱ्या एजन्सींची नावेही जाहीर करण्यात आलेली नाहीत, ज्यामुळे पारदर्शकतेचा अभाव आहे.
याआधीच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले असून, इतर राज्यात बोगस डिलिव्हरी, निकृष्ट कांद्याची खरेदी आणि अधिकाऱ्यांचे संगनमत उघड झाले आहे.
यंदाही अशीच स्थिती असून, स्वस्तात खरेदी केलेला कांदा चढ्या दराने विकला जाऊन काही मंडळींना कोट्यवधींचा लाभ होणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत नाफेडचा खरेदी दर कमी असल्याने शेतकऱ्यांना तोटा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या पाच हजार कोटींच्या कथित घोटाळ्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
कांदा खरेदी रद्द न केल्यास स्वतंत्र भारत पक्ष स्वतंत्र समित्यांमार्फत खरेदीवर लक्ष ठेवणार असल्याचे घनवट यांनी सांगितले आहे.