आजच्या वर्तमान पत्रात सराव परीक्षेत मार्क कमी मिळाले म्हणून शिक्षक पित्याने मुलीला इतकी मारहाण केली की त्यात त्या मुलीचा मृत्यू झाला. ही अतिशय संतापजनक आणि उद्वेग आणणारी गोष्ट आहे.
का येत हे दडपण ? तर समाजात चांगले मार्क्स म्हणजे पाल्य हुशार, त्यामुळे चांगल्या ठिकाणी ॲडमिशन होईल. मग चांगली नोकरी, मग चांगले स्थळ, परदेशी संधी हा समज इतका दृढ झाला आहे की.. पालक आपल्या राक्षसी इच्छा मुलांवर लादत आहेत.
पालकांना परिस्थिती, काही अडचणी यामुळे आपलं करिअर करता आलेले नसते, मग हे पालक आपली स्वप्नं मुलांकडून पूर्ण करून घेण्यासाठी मुलांवर दबाव आणतात. यात पालक हे विसरतात, आपण मुलांचे फक्त आणि फक्त पालक असतो, मालक नाही.
स्पर्धा इतकी वाढली आहे, त्याचं पालक इतकं दडपण घेतात, की मुलांना ते सतत जगात तुम्ही स्वतःला सिद्ध करायला तयार रहायला हवे, याची दडपण आणतात.
घरी दोन मुले असतील तर त्यांच्यात आईवडिल तुलना करत रहातात, अगदी जुळी भावंडे सुध्दा त्यांचे व्यक्तिमत्त्व वेगवेगळे असते... स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असणाऱ्या व्यक्तींची बुध्दीमत्ता वेगवेगळी असणार ना ?
या गुणांच्या ताणामुळे मुलांना, पालकांना मानसिक ताण येतो. त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो.ही गोष्ट वेगळीच. या ताणामुळे मुलं कॉपी सारख्या चुकीचे मार्ग स्विकारतात. यामुळे कदाचित आयुष्य वेगळ्याच मार्गावर जाऊ शकते. यावर उपाय आपले आपण शोधावे.
मुलांशी सातत्याने म्हणजे रोजच्या रोज संवाद साधला पाहिजे.मुलांच्या अडचणी पालकांना माहिती असल्याच पाहिजेत. मुलांची कुवत पालकांनी लक्षात घ्यायला हवं, मुलांकडून अवास्तव अपेक्षा करु नये.
शिक्षणाचे मुलांना महत्त्व समजावून द्यावे पण मार्क्स म्हणजे सर्वस्व नाही हे आधी पालकांनी लक्षात घेऊन मुलांना कृतीतून, उदाहरणातून समजून द्यावे लागेल.
प्रत्येक मुलांमध्ये काही तरी कलागुण असतात. त्यात त्यांना प्रोत्साहित करावे. त्यांच्या काही तरी इच्छा असतात त्या जाणून घेऊन त्यातील धोके आणि फायदे त्यांना समजावून द्या.
पालकांनी चांगले पालकत्व निभावण्यासाठी स्वतः दडपण घेणं बंद करायला हवे. तुम्ही मुलांना सतत सूचना देणं, आम्ही तुम्हाला एवढ्या सुखसोयी देतोय, असे खोचक बोलणे टाळले पाहिजे. त्यासाठी आपल्या पिल्लांशी मैत्र करायला जमले पाहिजे.
मुलांचा हात ती चालायला लागल्यावर आपण सोडतो पण तो सोडलेल्या हाताकडे आणि स्वतंत्र चालणाऱ्या पावलांकडे आपण लक्ष देत रहायचे. एवढं केलं तरी आपण सुजाण पालकत्व निभावून नेऊ शकू.!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)