अहिल्यानगर - तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनी मंदिर ११ जूनपासून रात्रीच्या वेळेत बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय देवस्थान विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
सुरक्षा व स्वच्छतेच्या कारणास्तव रात्री १०.३० ते पहाटे ४ या वेळेत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, शनि अमावस्या, गुढीपाडवा आणि शनि जयंतीसारख्या विशेष दिवशी मंदिर २४ तास खुले राहणार आहे.
शतकाहून अधिक काळ २४ तास खुले असणारे हे मंदिर देशभरात अनोख्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. येथे देव आहे पण देऊळ नाही, वृक्ष आहे पण छाया नाही, ही आगळी वेगळी ओळख आहे.
मात्र, सतत उघडे असणारे मंदिर व वाढती भाविकांची संख्या लक्षात घेता सुरक्षा व्यवस्थेवर ताण येत होता. काही एजंटांमार्फत भाविकांची फसवणूक होत असल्याच्या घटनांनंतर देवस्थानकडून बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
दररोज ७००-८०० भाविक मंदिर परिसरातील भक्तनिवासात थांबतात. मंदिर बंद असल्यास त्याचा फायदा स्थानिक हटेल, लॉज व्यवसायाला होईल, असेही मानले जाते.
दरम्यान, शनिशिंगणापूर अॅप संदर्भात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची मागणी जोर धरू लागली आहे.
तसेच, गावकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांच्यासाठी स्वतंत्र ‘गावकरी गेट’ उभारण्यात येणार असून, आधार कार्डच्या आधारे केवळ स्थानिक ग्रामस्थांना या मार्गाने प्रवेश देता येणार आहे.
पानस तीर्थ प्रकल्पांतर्गत उभारलेल्या नवीन महाद्वार व भुयारी मार्गामुळे भाविकांची दर्शनासाठी सुयोग्य व्यवस्था करण्यात आली आहे, असे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.