अहिल्यानगर - श्री शनैश्वर देवस्थान, शनिशिंगणापूर येथे ऑनलाईन पूजा व तेल अर्पणासाठी तयार करण्यात आलेल्या कथित बनावट मोबाईल अॅप घोटाळ्याने खळबळ उडवली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते विशाल सुरपुरिया यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सुरपुरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिशिंगणापूर हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून, आधुनिक काळानुसार देवस्थानकडून अधिकृत अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पूजाविधी व देणगी स्वीकारण्याची सुविधा सुरू करण्यात आली होती.
मात्र, हे अधिकृत अॅप बंद झाल्यानंतरही अनेक बनावट अॅप्स कार्यरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. या बनावट अॅप्समधून प्रति पूजा व तेल अर्पणासाठी भाविकांकडून १५०० ते २००० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते.
सुमारे १० पेक्षा अधिक अॅप्स कार्यरत आहेत. प्रत्येकी अॅपचे २ ते ३ लाख सदस्य असल्याचा अंदाज असून, या माध्यमातून ४०० ते ५०० कोटी रुपयांची आर्थिक लुट झाल्याचा गंभीर आरोप सुरपुरिया यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, या घोटाळ्यामध्ये देवस्थानमधील काही कर्मचारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंबंधी पुरावेही पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले आहेत. यावेळी सीए गौरव गुगळे उपस्थित होते.
भाविकांच्या श्रद्धेचा खेळ करत आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरोधात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच संबंधितांची संपत्ती आणि मालमत्तेची चौकशी करून दोषींना शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी सुरपुरिया यांनी केली.
प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान याबाबत शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी 'अधिकृत पुजा ऍप्लिकेशन'ची खात्री केली असता दोन अनधिकृत ऍप्स असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत शहानिशा करुन कारवाई केली जाईल' अशी माहिती माध्यमांना दिली आहे.