अंबाजोगाई (बीड) - जीवनात यश प्राप्त करण्यासाठी निंदक किंवा स्पर्धक असले पाहिजेत, त्यांच्यामुळे आपल्यात यश प्राप्त करण्याची जिद्द व उर्जा निर्माण होते. असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून येथे केले.
आधार माणुसकीच्या उपक्रमांतर्गत पालकांचे छत्र हलवलेल्या ८०० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्कूलकिट व मातांना साडीचोळीची भेट देण्यात आली. त्याप्रसंगी नवनीत काँवत बोलत होते.
प्रसिध्द व्याख्याते इंद्रजित देशमुख, आयआरएस अधिकारी नितिका विलाश, ठाणे येथील विद्यार्थी विकास योजनेचे संचालक अरुण करमरकर, पोलिस उपअधिक्षक अनिल चोरमले, डाॅ. सुनिता बिराजदार, गंगा माऊली शुगरचे उपाध्यक्ष हनुमंतकाका मोरे यावेळी उपस्थित होते.
तसेच केएसबीएल ग्रुपचे संचालक शेख शकील बागवान, अर्थवेल पतसंस्थेचे संस्थापक बालासाहेब माने, उद्योजक सरला मर्लेचा, जाधव कोचिंग क्लासेसच्या संचालक ज्योती जाधव, सहशिक्षक स्नेहा लोमटे, आरोग्य अधिकारी डाॅ. आशा मारवाले (जुने), डाॅ. अश्विनी साबळे हेही उपस्थित होते.
आपल्या जीवनातील अनुभव सांगताना काँवत म्हणाले, सैनिकी शाळेत शिक्षण घेतच वडिलांनी दहावीसाठी दिलेले टार्गेट आपण साध्य करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले, आणि ते साध्य केले. पुढे हाच अनुभव प्रत्येक ध्येय साध्य करण्यात उपयोगी पडला.
आयआयटी होऊन चांगल्या पॅकेजची नोकरी लागलेली असताना यात आपण देशाच्या उपयोगी पडत नसल्याचे लक्षात आल्याने, ही नोकरी सोडून युपीएससीची परीक्षा दिली. दहावीतील अनुभव लक्षात ठेऊन अभ्यास केला. त्यामुळे यात यश प्राप्त झाले आणि आयएएस झालो.
देशाची सेवा करण्यात यश प्राप्त केल्याचे काँवत यांनी सांगीतले. त्यांनी निंदकाऐवजी शुभचिंतक हा शब्द वापरला. यावेळी नितिका विलाश व अरुण करमरकर यांनीही उपस्थित मुलांना व महिलांना मार्गदर्शन केले.
दानामुळे एखाद्याचे आयुष्य उज्वल होते. आधार माणुसकीच्या उपक्रमातून मुलांच्या शिक्षणास मदत होत आहे. यातून मानवता जपली जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी केले.
मुलांनी मोबाईलपासून दूर राहिले पाहिजे, कारण यातून फायद्यापेक्षा तोटे जास्त आहेत. त्यामुळे या मोबाईलचा बंदोबस्त कसा करायचा ते प्रत्येकाने ठरवले पाहिजे, जी माता (आई) आयुष्यभर आपल्यासाठी स्वप्न बघते, तिची काळजीही आपण घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी मुलांना केले.
आधार माणुसकीच्या उपक्रमांतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंब, एचायव्ही बाधीत व कोरोनाग्रस्त कुटूंबातील ८०० विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढ्या शैक्षणिक साहित्याची स्कुलकिट देण्यात आली. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व्दिगुणीत झाला होता.
प्रास्ताविक आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी केले. सूत्रसंचालन शिवानंद गुळवे यांनी केले. पत्रकार प्रशांत बर्दापूरकर यांनी आभार मानले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव झाला. महिलांना साडी चोळीची भेट देण्यात आली.
यासाठी कार्यक्रमासाठी उपक्रमाचे सदस्य धनराज पवार, संजय सुरवसे, विकास शिंदे, अनंत निकते, चंद्रशेखर शिंदे, सुधाकर शिंदे, बन्सी आपेट, ग्रामीण विकास मंडळातील महिला, दत्तपूर, श्रीपतरायवाडी येथील महिला बचत गटांनी पुढाकार घेतला.