जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा : ७.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त, १२ जणांवर कारवाई


अहिल्यानगर – नगर तालुक्यातील अरणगाव शिवारात देशमुख पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नगर तालुका पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना रंगेहाथ पकडले. तर चार जण फरार झाले आहेत.


या कारवाईत एकूण ७ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहिम राबवण्यात येत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक दि. ८ जुलै रोजी अरणगाव परिसरात गस्त घालत होते. त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हॉटेल सारंगीच्या पाठीमागे एका शेडमध्ये तिरट नावाचा हार-जीतीचा जुगार सुरू आहे.

या ठिकाणी छापा टाकताना काही आरोपी पळण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पोलिसांनी पाठलाग करून ८ जणांना ताब्यात घेतले, तर ४ इसम अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.

या कारवाईत ९५ हजार ४०० रुपये रोख, ६८ हजार रुपयांचे ६ मोबाईल फोन, व ५ लाख ९० हजार रुपये किंमतीची चार वाहने असा एकूण ७ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


 ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे - 

  • अमित बाळासाहेब चिंतामणी (सर्जेपुरा)
  • फय्याज अख्तर शेख (तख्ती दरवाजा)
  • राजू प्रकाश काळे (कौंडगाव)
  • युवराज करंजुले (फकीरवाडा)
  • नासीर गुलाब खान (मुकुंदनगर)
  • संजय नामदेव शेलार (समर्थ नगर)
  • समीर आयुब शेख (पारशा खुंट)
  • (सईद ताहेर बेग (काटवन खंडोबा)

फरार आरोपी : अक्षय पवार, शिवा पाचारणे व इतर दोन अनोळखी इसम. या प्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक प्रल्हाद गिते आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या केली.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !