अहिल्यानगर - जिल्ह्यात पारनेर व बेलवंडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ५ लाख ५२ हजार ८८० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, काही आरोपी फरार झाले आहेत.
दिनांक ७ जुलै रोजी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने निघोज बसस्थानक परिसरात कारवाई करत सुपर कॅरी वाहनातून गुटखा वाहतूक करणाऱ्या अक्षय लाळगे या आरोपीस ताब्यात घेतले.
या वाहनातून ३६ हजार १८६ रुपये किमतीच्या सुगंधी तंबाखू व पानमसालासह, ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ४ लाख ८६ हजार १८६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात इतर दोन आरोपी आतिक उर्फ डॉन शेख व इशान शेख हे फरार आहेत. पारनेर पोलीस स्टेशनमध्ये ग भारतीय न्याय संहिता कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच दिवशी दुसऱ्या कारवाईत बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गव्हाणेवाडी परिसरात करण काळे व अनिकेत सोनवणे या दोघांनी गुटख्याचा साठा केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने छापा टाकला.
आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले, मात्र त्याठिकाणी ६६ हजार ६९४ रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला व सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आला. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ५ लाख ५२ हजार ८८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, तर तीन आरोपी फरार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे व त्यांच्या पथकाने केली.
या पथकात पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, अजय साठे, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, अरविंद भिंगारदिवे, उमेश खेडकर, सुनिल पवार, दिनेश मोरे, सुनिल दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे, दिपक जाधव, जालिंदर दहिफळे यांचा समावेश होता.
पोलीस प्रशासनाच्या या जलद व प्रभावी कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रतिबंधित पदार्थांच्या अवैध साखळीला मोठा दणका बसला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास स्थानिक पोलिस करीत आहेत.