अहिल्यानगर – जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा, नाशिक परिसरात सक्रिय असलेल्या घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरच्या पथकाने २४ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मुख्य आरोपीसह तीन जणांना अटक केली आहे.
दिनांक २० जून रोजी संगमनेर तालुक्यातील बोटा येथील राहिवासी शालिनी शेळके यांच्या घरात बंद असताना घरफोडी झाल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक गठीत करण्यात आले.
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पथकाने कर्जत तालुक्यातून मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले (रा. बेलगाव), सुनीता उर्फ सुंठी काळे (रा. बीड) आणि एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले.
तपासात आरोपी मिलिंद भोसले याने घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याचे आणखी चार साथीदार शुभम उर्फ बंटी काळे, सोन्या उर्फ लाल्या भोसले, संदीप भोसले, व कुर्हा भोसले हे फरार आहेत.
या टोळीने अहिल्यानगर, पुणे, सातारा व नाशिक जिल्ह्यात मिळून एकूण १६ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून पोलिसांनी २०० ग्रॅम सोन्याचे दागिने, १ गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे, मोटारसायकल आणि लोखंडी कटावणीसह एकूण २४ लाख २६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
यामध्ये सोनारास विकलेले आणि घरामागे लपवलेले दागिनेही समाविष्ट आहेत. मिलिंद भोसले हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यासह १८ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, व उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली.
या घरफोडी टोळीच्या अटकेमुळे अनेक गुन्ह्यांची उकल होऊन जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या टोळीचे कंबरडे मोडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे.