अहिल्यानगर – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा (सावेडी उपनगर) व शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन यांच्या सौजन्याने दरवर्षी प्रकाशित होणारा 'वारसा' दिवाळी विशेषांक यंदाही वाचकांच्या भेटीला येत आहे.
मागील दहा वर्षांपासून यशस्वीरीत्या प्रकाशित होणाऱ्या या अंकास सलग पाच वर्षे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून, साहित्यिक वाचकांमध्ये या अंकाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
या वर्षीच्या अंकाची खास संकल्पना 'आपले गाव, आपले शहर – एक सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळख' अशी असून, स्थानिक इतिहास, सांस्कृतिक वारसा, भूगोल, आणि व्यक्तिमत्त्वांवर आधारित लेखांना प्राधान्य दिले जाणार आहे.
त्यासोबतच कविता, ललित लेख, आठवणी, अनुभव, विनोदी लेख अशा विविध साहित्यप्रकारांनाही अंकात स्थान दिले जाणार आहे. लेखांसोबत संबंधित छायाचित्रेही पाठवावीत. पाठवलेले साहित्य हे केवळ अप्रकाशित व स्वतःच्या लेखनाचे असावे, अशी अट ठेवण्यात आली आहे.
साहित्य पाठविण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२५ असून, इच्छुक लेखकांनी आपले लेखन jayant.yelulkar@gmail.com या ई-मेल पत्त्यावर पाठवावे.
‘वारसा’ दिवाळी अंकाच्या माध्यमातून लेखकांचे मौलिक लेखन वाचकांपर्यंत पोहोचावे, हीच संपादक मंडळाची अपेक्षा आहे, असे कार्यकारी संपादक जयंत येलुलकर यांनी सांगितले आहे.