मैफील ! विठ्ठलाच्या भक्तीरसात रंगली अहिल्यानगरची 'अभंगवारी'


अहिल्यानगर - आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनाहत एक कलासृष्टी, अहिल्यानगर यांच्या वतीने सावेडी येथील माऊली सभागृहात 'अभंगवारी' या अभंग गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पावसाच्या सरींमध्येही रसिकांनी हाऊसफुल्ल प्रतिसाद देत सभागृह गजबजून गेले.

जय जय राम कृष्ण हरी, सुंदर ते ध्यान, ज्ञानियांचा राजा, माझे माहेर पंढरी, अवघे गरजे पंढरपूर, कानडा राजा पंढरीचा अशा अनेक गोड अभंगांनी वातावरण भक्तीरसात न्हाऊन निघाले. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, मुक्ताबाई, कान्होपात्रा यांसारख्या संतांच्या रचना सादर करण्यात आल्या.

विशेष म्हणजे 'अनाहत'च्या लहान सदस्यांनी वारीत होणारे दिंडी, रिंगण, धावा या परंपरागत कार्यक्रमांचे अप्रतिम सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

नगरमधील प्रथितयश गायक अनुजा कुलकर्णी, अभिजीत आपस्तंभ, ओंकार देऊळगावकर, अमृता बेडेकर, रश्मी गंधे, श्रेया सुवर्णपाठकी आणि स्वरा देऊळगावकर यांच्या सुरेल गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या गायनाला 'वन्स मोअर'च्या प्रतिसादाने रंगत चढली.

वादक कलाकार म्हणून तबला आणि टाळावर प्रसाद सुवर्णपाठकी, आनंद कुलकर्णी, सुपर्ण प्रताप, पखवाजवर सौरभ साठे, संवादिनीवर संकेत सुवर्णपाठकी, प्रणव देशपांडे आणि तालवाद्यवर कुलदीप चव्हाण यांनी सुरेल साथसंगत केली.

तबला, टाळ आणि पखवाज यांची जुगलबंदी विशेष आकर्षण ठरली. या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन नाट्य परिषद उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रा. प्रसाद बेडेकर यांची होती. अभंग गायनाला नाट्यात्मक अनुभव देण्याचा अनोखा प्रयोग यानिमित्ताने करण्यात आला.

रंगमंच व्यवस्था नाना मोरे, प्रकाश योजना गणेश लिमकर आणि बंटी ढोरे तर ध्वनी व्यवस्था अवधूत गुरव यांनी सांभाळली. महेश काळे आणि चैताली बर्डे यांनी रसाळ निवेदन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.

सूत्रसंचालन माणिक देव आणि जान्हवी देऊळगावकर यांनी केले तर वैदेही बोरा यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी योगेश पंडित, रघुनाथ सातपुते, प्रसाद लामरुड, महेश कुलकर्णी आदींचे विशेष योगदान लाभले.

या कार्यक्रमासाठी शिल्पकार प्रमोद कांबळे, भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, बालरंगभूमी परिषदेचे प्रमुख कार्यवाह अनंत जोशी, किशोर कुलकर्णी, भूषण भणगे, अविनाश देऊळगावकर, शेखर दरवडे, हर्षद भावे, चंद्रकांत पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !