अहिल्यानगर - राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरात एका ओढ्यात पँट-शर्ट घातलेला ‘पुरुष’ मृतावस्थेत तरंगतोय, अशी माहिती पोलिसांना मिळाली, अन एकच खळबळ उडाली.
गंभीर चेहऱ्याने पोलिस निरीक्षक संजय ठेंगे आपल्या पथकासह घटनास्थळी धावले. तिथे आधीच बघ्यांची गर्दी झाली होती. कोणी म्हणे खून, कोणी म्हणे आत्महत्या, काही जण तर ‘क्राईम पेट्रोल’चा पुढचा एपिसोडच लिहू लागले.!
पोलीसांनी ग्रामस्थांच्या मदतीने ‘मृतदेह’ बाहेर काढण्यास सुरुवात केली. पंचनामा करायचा तयारी झाली. पण... जेव्हा तो 'मृतदेह' बाहेर आला, तेव्हा सर्वांचा चेहरा पाहण्यासारखा झाला.
कारण तो कुठला पुरुष नव्हे, तर एकदम हुबेहुब माणसासारखं दिसणारं 'बुजगावणं' निघालं.! होय, पक्षी आणि प्राण्यांना फसवण्यासाठी शेतात उभं केलं जाणारं बुजगावणंच ते.
शेतकऱ्याने आपलं काम संपल्यावर ते ओढ्यात फेकलं असावं, आणि पावसाच्या पाण्याबरोबर ते प्रवास करत पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी पोहोचलं.! सुदैवाने कुणी तरी काळजीपूर्वक पोलीसांना खबर दिली, हे कौतुकास्पद.!
पण थोडं निरीक्षण, थोडं तर्क आणि थोडं ‘बुज’ वापरलं असतं, तर पोलिसांचा वेळ, पंचनामा आणि तमाशा, सगळं वाचलं असतं.! या ‘बुजगावणं प्रकरणा’ने गावात दिवसभर मिश्किल चर्चा रंगल्या होत्या.