अहिल्यानगर - निगडी (पुणे) येथे नुकत्याच पार पडलेल्या रोलर अँड इनलाइन हॉकी इंटर क्लब स्टेट लेव्हल चॅम्पियनशिपमध्ये अहिल्यानगर येथील टीम एम स्पोर्ट्स क्लबने प्रभावी आणि उल्लेखनीय कामगिरी सादर करत जिल्ह्याचे नाव उज्वल केले.
ही स्पर्धा दिनांक २७ ते २९ जून २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अमरावती, पुणे, मुंबई, कोल्हापूर, जळगाव, नागपूर, धाराशिव आदी ठिकाणांहून आलेल्या ४३ संघांनी सहभाग घेतला होता.
दिवसभर सकाळी सहा ते रात्री अकरा या वेळेत विविध वयोगटांतील (८, १०, १२, १४, १७ आणि सीनियर्स) खेळाडूंमध्ये उत्साहपूर्ण सामने रंगले. टीम एम, अहिल्यानगरकडून टाइनी टॉटस (८ वर्षाखालील), कॅडेट (१० वर्षाखालील), सब-ज्युनिअर (१२ वर्षाखालील) आणि सीनियर्स (१८ वर्षांवरील) या वयोगटांमध्ये प्रतिनिधित्व केले.
स्पर्धेत टाइनी टॉटस संघाने तिसरा क्रमांक पटकावून करंडक जिंकला. सब ज्युनिअर वयोगटातील खेळाडूंनी दुसरा क्रमांक मिळवत ७ हजार रुपयांचे रोख बक्षीस पटकावले. यावर्षी विशेष लक्षवेधी कामगिरी सीनियर वयोगटाकडून पाहायला मिळाली.
टीम एमच्या यशाबद्दल कोच प्रमोद डोंगरे, शुभम करपे, तसेच प्रियदर्शनी स्कूलचे डायरेक्टर बाळासाहेब खोमणे यांनी अभिनंदन केले. जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे सेक्रेटरी असिफ शेख यांनी टीम एमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.