अहिल्यानगर - शहरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधीत तंबाखू व मावा तयार करणाऱ्या दोन ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ३ लाख २९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ५ आरोपींविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही कारवाई केली. दि. १० जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारे निलक्रांती चौक येथे अभिनव पान स्टॉलवर छापा टाकून गौरव राजू आल्हाट (वय ३४, रा. निलक्रांती चौक) याला अटक केली.
त्याच्याकडून २ किलो सुगंधीत तंबाखू, मावा तयार करण्याचे १ मशीन, सुपारी कटींग मशीन असा ९६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच दिवशी दुसऱ्या टप्प्यात माणकर गल्ली येथील जिव्हेश्वर पान स्टॉलवर पोलिसांनी छापा टाकला.
येथे संजय मुरलीधर व्यवहारे (वय ५२, रा. भूषणनगर केडगाव), मयूर शंकर उवाळे (वय ३७), गोविंद राधाकिसन मंगलारप (वय ४८) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० किलो सुगंधीत तंबाखू, ०२ मावा मशीन, मावा तयार करण्याचे साहित्य, इलेक्ट्रिक वजन काटे असा २,३३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अमोल मदन सदाफुले हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईत एकूण ३ लाख १५ हजार रुपयांच्या ४ मावा मशीन, ५ हजार रुपये किमतीचे दोन वजन काटे, १२ किलो सुगंधीत तंबाखू असा एकूण ३ लाख २९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, शंकर चौधरी, अजय साठे, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, अरविंद भिंगारदिवे, उमेश खेडकर, सुनिल पवार, दिनेश मोरे, सुनिल दिघे, अमोल कांवळे आदींच्या पथकाने केली.
या दोन्ही कारवाया प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप परशुराम पवार यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा अधिक तपास तोफखाना पोलिस करीत आहेत. या कारवायांमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.