अहिल्यानगर - जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. १ जुलै ते १५ जुलै २०२५ या कालावधीत एकूण ५८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, २६९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ५ कोटी १७ लाख ३ हजार २६६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईसाठी विशेष पथकप्रमुख प्रभारी अधिकारी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली विविध गुन्हे शाखांच्या समन्वयातून सातत्याने प्रयत्न करण्यात आले. पोलिस उपअधीक्षक नेवासा विभाग, श्रीरामपूर विभाग, संगमनेर विभाग, शेवगाव विभाग, पाथर्डी विभाग यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखांनी या कारवाया प्रभावीपणे पार पाडल्या.
प्रमुख केलेल्या कारवायांमध्ये जुगार, देशी दारू, विदेशी दारू, सुगंधी तंबाखू मावा, गुटखा, वाळू तस्करी, तसेच विविध कायद्यांअंतर्गत गुन्हेगारी कारवाया समाविष्ट आहेत. खालीलप्रमाणे विशिष्ट विभागवार कारवाईची माहिती वर दिलेली आहे.
या कारवाया पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, अजय साठे, सुनिल पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, कॉन्स्टेबल सुनिल दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे, दिपक जाधव, जालिंदर दहिफळे यांनी करत यशस्वीरित्या अवैध धंद्यांना चाप लावण्याचा प्रयत्न केला.
जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पुढील काळातही असेच धडक मोहीम राबवून अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.