अहिल्यानगर - नवनागापूर येथील आनंदनगर परिसरात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पोलिस पथकाने छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईत सुगंधीत तंबाखू, तयार व कच्चा मावा, मावा तयार करण्याच्या मशीनसह फोक्सवॅगन पोलो चारचाकी वाहन असा एकूण ८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर विशेष पथक सक्रिय झाले आहे. दि. २२ जुलै रोजी एमआयडीसी हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती.
आनंदनगर येथील अमोल संप्रे यांच्या इमारतीच्या टेरेसवर पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या मावा तयार करण्याचा कारखाना सुरू आहे. पोलिसांनी पंचासमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला असता काही व्यक्ती इलेक्ट्रिक मशीनवर मावा तयार करताना आढळले.
पोलिसांनी त्वरित कारवाई करत शुभम दत्तात्रय हजारे (रा. केडगाव), मंजितकुमार विजयकुमार सिंग (रा. बिहार, सध्या नवनागापूर), आकाश बाळासाहेब शिरसाट, प्रशांत अशोक नवथर, आणि महेश देविदास खराडे या पाच जणांना ताब्यात घेतले.
या कारखान्यातून १४० किलो तयार मावा (किंमत १ लाख ४० हजार रु.), ७२ किलो सुगंधीत तंबाखू (८६ हजार ४०० रु.), ७० किलो कच्ची सुपारी (३५ हजार रु.), मावा तयार करण्याची मशीन (८० हजार रु.), सुपारी कटींग मशीन (३५ हजार रु.), आणि फोक्सवॅगन पोलो कार (५ लाख रु.) असा एकूण ८.७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, अजय साठे, सुनिल पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, कॉन्स्टेबल सुनिल दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे, दिपक जाधव, जालिंदर दहिफळे यांनी केली.
ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे विशेष पथक, स्थानिक अंमलदार व पंचासमक्ष पार पडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईमुळे नवनागापूर परिसरातील अवैध मावा धंद्याला मोठा धक्का बसला आहे.