वनसंवर्धन ! आपली आजची गरज, उद्याच्या पिढीचे भविष्य


आज वनसंवर्धन दिन आहे. असे दिन साजरे करण्याची वेळ आपल्या निष्काळजीपणामुळे आणि पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे आपल्यावर आली आहे. वृक्षसंवर्धनाचे संदेश पुराणकाळापासून आपल्याला देण्यात आलेले आहेत.

आपले पूर्वज आपण त्यांचे सांगणे ऐकावे, म्हणून प्रत्येक गोष्टीत देवांचा आधार, कधी भिती दाखवत. याचं कारण मनुष्याने ऐकावं आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणाव्यात. आता हाच श्लोक पहा ना...

अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं
दशचिंचिणीकम !
कपित्थबिल्वा मलकत्रय च
पंचाम्रवापी नरकं न पश्यते !

अर्थात पिंपळ, कडुनिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे आणि कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष आणि आंब्याची पांच झाडे जो लावेल तो नरकात जाणार नाही.

असं काही तरी आमिष दाखविल्याशिवाय लोक वृक्षसंवर्धन करणार नाहीत हे आपल्या पुर्वजांना चांगले माहीत होते. म्हणून असे श्लोक तयार झाले असतील. होय ना ?

आपण पर्यावरणाची जी नासधूस केलीय त्याचे परिणाम आपण पहातो.. अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर, रोगराई हे सारं सहन करणं म्हणजे नरकासमानच आहे की नाही.! आपल्या तर साऱ्या  संतांनी अभंगाच्या माध्यमातून आपल्याला वृक्षवल्लींचे महत्व सांगितले आहे आणि पर्यावरणाचा जागर मांडला आहे.

भारतीय आयुर्वेदात वृक्ष, वेली, फुले, फळे यांचे कितीतरी औषधी उपयोग सांगितले आहेत. त्यांचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनात होतही आहेच. या कोरोनाच्या काळात या आयुर्वेदाने आपले महत्त्व आपल्याला दाखवून दिले आहेच.

आज या वृक्षसंवर्धन दिनानिमित्त मला वेगळ्या विषयाकडे आपलं लक्ष वेधायचंय. विदेशी झाडांच्या बेसुमार लागवडीने आपली देशी वनसंपदा हद्दपारीच्या मार्गाला लागलीय. सुबाभूळ, गुलमोहर, ह्या झाडांवर पक्षी घरटेही करत नाहीत. आपण मात्र त्या लालभडक फुलांच्या मोहात जमिनीचा कस कमी करतोय.

आॕस्ट्रेलियातून आलेल्या निलगिरीने तर आपल्या आम्लयुक्त पानांमुळे जमीनीचा कस तर कमी केला आहेच, त्याबरोबर स्थानिक झाडांचा जगण्याचा प्रयत्नही हाणून पाडला आहे.

पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॕथोडिया यासारखी झाडे निव्वळ शोभेसाठी लावताना आपण आपल्या पारंपारिक झाडांना नाकारुन पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत हे लक्षात येतच नाही आपल्या.!

या परदेशी झाडांमुळे स्थानिक जीवविविधतेची साखळी कमकुवत होत जात आहे. दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आलेल्या गव्हाबरोबर तिकडचे पार्थेनियम तणही आपल्याकडे आलेय. तेच ते गाजर गवत याने आपल्याला सळो की पळो करुन सोडले होते.

या विदेशी झाडांच्या लागवडीने आपल्या येथील पक्ष्यांचा, किड्यांचा अधिवास असलेली झाडेच नष्ट होत आहेत. अन्नसाखळीत एकमेकांवर अवलंबून असलेले अनेक जीव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

आपण मात्र सोशल मिडीयावर 'चिमणी दिवस'.. 'पक्षी दिन' साजरा करण्यातच धन्यता मानू लागलो आहोत. यासाठी स्थानिक झाडझुडुपाबाबत लोकांच्या मनात प्रबोधनाची अत्यंत गरज आहे. कांचन, बहावा, शिरीष, काटेसावर, हातगा, शेवगा, कदंब, सुरंगी यांची लागवड केली पाहिजे.

पिंपळ, वड, आंबा, चिंच, कडुनिंब या झाडांच्या लागवडीने पावसाला आमंत्रित केले जाते, या विश्वास मनामनात जागवला पाहिजे. मनीप्लँट लावण्यापेक्षा तुळस लावणं कधीही चांगलच ना ! इतर देशांसारखे वृक्षसंवर्धनासाठी कडक नियम केले पाहिजेत.

वृक्षतोडीला शिक्षेसारखे कठोर नियम केले पाहिजेत. पुढच्या पिढीला संपत्ती नाही ठेवली तरी चालेल, पण त्यांना जगण्यासाठी आवश्यक असणारी आणि त्यांचा हक्क असणारे पाणी, शुध्द हवा, निरोगी हवामान एवढे तरी जतन करुन ठेवणे हे तरी आपल्याच हातात आहे.!

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !