अहिल्यानगर - भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल १७ लाख ३२ हजार ९९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर मार्गावरील हॉटेल इंद्रायणी शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली.
या कारवाईत १२ इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत दि. २३ जुलै रोजी ही कारवाई पार पडली.
विशेष पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाऱ्यामार्फत माहिती मिळाली की, हॉटेल इंद्रायणीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत आहेत. ही माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांनासमवेत विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी छापा टाकताच काही जण पळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी पाठलाग करून १२ इसमांना अटक केली. त्यांच्याकडून ९२ हजार ९९० रुपये रोख रक्कम, २ लाख ४० हजार रुपये किंमतीचे १६ मोबाईल फोन्स, व १४ लाख रुपये किंमतीची ६ वाहने असा एकूण १७ लाख ३२ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अटक केलेले आरोपी पुढीलप्रमाणे – अनिकेत कुऱ्हाडे, राहुल लड्डा, भुषण धाडगे, मुस्सा शेख, दिलीप दुसुंगे, जिशान इनामदार, आसलम शेख, उमेश कोतकर, समिर सय्यद (रा. पुणे), रफिक शेख, अल्ताप शेख, शब्बीर खान (सर्व जण अहिल्यानगर).
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर व राजेंद्र वाघ यांच्यासह हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, अजय साठे, सुनिल पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, कॉन्स्टेबल सुनिल दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे, दिपक जाधव, जालिंदर दहिफळे, यांचा सहभाग होता.
ही कारवाई ही जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधातील पोलिसांची प्रभावी आणि परिणामकारक कारवाई ठरली आहे. अवैध व्यावसायिकांनी या पथकाचा चांगलाच धसका घेतला आहे.