गडचिरोली - खेडेगावातून शिक्षणासाठी गडचिरोली शहरात आलेल्या दोन तरुणींची एक साधीशी परंतु त्यांच्यासाठी अनमोल ठरलेली गोष्ट नुकतीच गमावली गेली होती. घरच्यांनी कष्टाने दिलेले थोडेफार पैसे साठवत, प्रत्येकीने हजार रुपये जमवले आणि मिळून एक सेकंड हॅन्ड सायकल खरेदी केली.
किंमत फक्त २,००० रुपये... पण या सायकलमागे त्यांचे स्वप्न होतं, मेहनत होती, आणि स्वावलंबनाचं एक पाऊल होतं. मात्र काल त्या दोघींच्या डोळ्यात अश्रू होते, आनंदाचे नव्हे, तर दु:खाचे. कारण हीच सायकल अचानक चोरीस गेली. सायकल न दिसल्यावर त्या हवालदिल झाल्या.
काय करावे, कुणाकडे जावे, हेच कळेना. अशा वेळी त्या दोघींनी हिम्मत करून गडचिरोली पोलीस ठाण्यात जाऊन पोलिस काकांना आपली कहाणी सांगितली. या दोन निरागस चेहऱ्यांमागे असलेलं स्वप्न पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण आणि त्यांच्या टीमने ओळखलं.
"हे आमचं कर्तव्य जरी असलं, तरी त्यांचा आमच्यावर विश्वास होता. तो मोडू नये म्हणून आम्हीही मनापासून प्रयत्न केला," असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर सुरू झाला शोध. शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. संशयित हालचालींवर लक्ष ठेवलं गेलं.
अखेर पोलिसांच्या तडाखेबंद तपासामुळे सायकल चोरी करणारा चोरटाही सापडला आणि त्या सायकलचा पत्ता लागला. पोलिसांनी दोघींना पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावलं. ज्या सायकलीसाठी त्यांनी पै पै साठवली होती, तीच सायकल त्यांच्या हातात परत देण्यात आली.
त्या दोघींच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, पण यावेळी ते अश्रू आनंदाचे होते. "थँक्यू काका... थँक्यू... थँक्यू..." हे शब्द त्या दोघी सतत म्हणत होत्या. त्या सायकलची किंमत कदाचित जास्त नव्हती, पण तिचं मूल्य त्या दोघींसाठी अमूल्य होतं. आजच्या या घडामोडीतून केवळ एक सायकल परत मिळाली नाही, तर त्या दोघींचा विश्वासही पुन्हा एकदा परत मिळाला.
'हेल्पिंग हँडस' या उपक्रमाअंतर्गत काम करणाऱ्या पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व त्यांच्या पथकाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, पोलिसी वर्दीत केवळ 'कायदा' नाही, तर 'माणुसकी'ही असते.