सारी व्यवस्था विस्कळीत झालीय. सार्वजनिक सेवेत जे काम करीत आहेत, त्यांना जनतेशी काहीही देणं घेणं उरलेलं नाही. जनतेलाही खऱ्या अर्थाने स्वतःच्या हक्काची, कर्तव्याची, गांभीर्याची काहीही जाणीव राहिली नाही.
हा आमचा आहे एवढं झालं की बस, ते त्याची 'री' ओढायला तयार असतात. भले यांनी लुटून खाल्लं तरी हा मात्र आमचा माणूस.. मग तो स्वतःच्या जातीचा, पक्षाचा असला म्हणजे झालं.
असा कोणता 'अर्थ' राहिलाय, की कोणती 'आदब' राहिलीय हल्लीच्या राजकारणातील मान्यवरांची. म्हणजे एकेकाळी आपल्या सर्वांच्या मनात गौरवाचे स्थान असलेल्या विधान परिषदेची.. विधानसभेची.
यांना सभा तरी कसं म्हणायचं.? ही तर सारी राडा करण्याची सन्मानाची जागा झालीय. काय आदर्श घ्यायचा यांचा.. कोणी म्हणतो, 'तू बाहेर ये, मग तुला दाखवतो'.. कोणी म्हणतो, 'मी असे कुत्रे नाही ठेवत आजूबाजूला'.
हे कोणा सामान्य माणसांचे वाक्य नाही, तर विधीमंडळ सदस्याचे वाक्य आहेत. एक म्हणतो "आमचा बाप आहे तो", तर कोणी बनियनवर हॉटेलमध्ये येत वेटरला फाईट मारतोय. अरे चाललंय काय हे.?
कोणाच्या बेडरूममधे नोटांचे बंडल भरलेली बॅग, तर कोण शेतकऱ्यांचा 'मसिहा' असल्याचे भासवून रमी खेळतोय.. तेही विधिमंडळात. हल्लीचं राजकारण समाजाच्या हितासाठी काही निर्माण करण्याचं राहिलेले नाहीच. आणि जनतेलाही आता असं काही नको आहे.
लोकांना फक्त हेच हवंय. शरद पवारांनी महाराष्ट्राला कसं लुटलं.. गडकरी रस्त्यातून कसा पैसा खातात.. उद्धव ठाकरेंनी शिवसेना कशी संपवली.. राऊत कसे सकाळी सकाळी बोअर करतात.. असंच.. अरे काय हे.?
आणि हे आरोप कोणी करावे, ज्यांची शरद पवारांच्या पायांच्या नखांची लायकी नाही, ज्याचं कोणतेही काम नाही, त्यांनी.? व्वा ! लाज वाटतेय यार.. गडकरी यांचा अभ्यास, दूरदृष्टी याचा जर अभ्यास केला, त्यातून काही शिकले तर काहीतरी चांगलं करू शकाल..
पण नाही.. जी माणसे ठाकरे घराण्यामुळे मोठी झाली, ज्यांना बाळासाहेबांचा आशीर्वाद मिळाला अन् त्यांच्या आयुष्याच सोनं झालं, ती जर ठाकरेंना शिव्या देत असतील, तर हे 'कलियुग' आहे, यावर विश्वास बसायलाच हवा.
शरद पवारांनी ५० वर्षांच्या वर राजकारण केलं, परंतु त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात अभ्यासपूर्वक कामही केलं, म्हणूनच या राज्याचा विकास झाला. आणि सहकार, उद्योग, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात या राज्याने मोठी कामगिरी करीत हे क्षेत्र समृद्ध केले.
यामागे पवार साहेबांसारखी सर्वस्पर्शी, रसिक, अभ्यासू, विकासाची दृष्टी असलेली माणसे होती. पवार साहेब, बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जेवायला जात आणि पु. ल. देशपांडे यांच्याकडेही गप्पा मारायला घरी जात असत.
यासाठी समृद्ध संस्कार असलेली विचारसरणी असावी लागते.आणि राजकारणापलिकडची नाती जपण्याचा निस्पृह स्वभाव असावा लागतो.
म्हणूनच आजही लालबहादुर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, मधु दंडवते, सुषमा स्वराज, मनोहर पर्रिकर, आर. आर. पाटील, विलासराव देशमुख, यांच्यासारखी उंचीची व्यक्तिमत्व जनतेच्या मनात प्रचंड आदराचे स्थान ठेऊन आहेत.
आणि आज आम्हाला काय पाहायला मिळतेय ? विधी मंडळात मारामारी, आणि त्याच्या बाहेरही हाणामारी.. या काही आमदारांनी आपल्या पदाची सारी गरीमा घालवून ठेवली आहे. ज्यांची साधे नगरसेवक होण्याची 'लायकी' नाही, ते लोक आमदार म्हणून विधान परिषदेत दिसायला लागली तर हेच होणार.!
कार्य करायचं नाहीय, कोणता चांगला आदर्श घ्यायचा नाही, कर्तृत्व तर अजिबात नाही. यांना फक्त राखून ठेवलंय भुंकायला... हो हेच वास्तव आहे. आपण फक्त म्हणायचं, शाहू, फुले, आंबेडकरांची परंपरा लाभलेला.. असा आमचा महाराष्ट्र.! पण, प्रत्यक्षात.. ये बाहेर तुला दाखवतो.!
- जयंत येलुलकर
(मा. नगरसेवक, अहिल्यानगर)