अहिल्यानगर – जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने कर्जत व श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू वाहतूक करणाऱ्या एकूण ६ आरोपींना अटक केली आहे.
या कारवाईत सुमारे ११ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पहिल्या कारवाईत दि. ५ जुलैला पोलीस उपअधीक्षक (परिविक्षाधीन) संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करताना राशिन-भिगवण रोडवर सापळा रचण्यात आला.
भिगवणकडून येणारी पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी इको गाडी थांबवून तपासणी केली असता, गाडीमध्ये प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाल्याच्या गोण्या आढळल्या.
गाडीतील तिघांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : संभाजी शिवाजी सरक (३५, रा. मदनवाडी, भिगवण) – गाडी चालक, अमर अनिल कांबळे (३५, रा. आंबेडकर नगर, राशिन), भाऊसाहेब किसन सकुंडे (२७, रा. मदनवाडी, भिगवण).
तपासणीत गाडीमधून १ लाख ५४ हजार ८८५ रुपये किंमतीची गुटखा, पानमसाला व तंबाखू तसेच ४ लाख रुपये किंमतीची इको गाडी असा एकूण ५ लाख ५४ हजार ८८५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या आरोपींविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुद्देमाल जप्त करून नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.
दुसरी कारवाई श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ११ लाख ५ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दि. ५ जुलै २०२५ रोजी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा ते घोडेगाव रस्त्यालगत इनामदार वस्ती परिसरात सापळा रचण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मारुती सुझुकी सुपर कॅरी गाडी अडवून तपासणी केली.
या गाडीमध्ये गुटखा, सुगंधी तंबाखू, सुपारी, कात, चुना असा साठा होता. एकूण मुद्देमालाची रक्कम ११ लाख ५ हजार रुपये आहे. याप्रकरणी रवि बबन दळवी (वय ३९), शिवाजी लहू म्हस्के (वय १९), नागेश निळकंठ संकरन (वय २७) या तिघांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांचाही सहभाग होता. अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. याप्रकरणी पुढील पोलिस तपास सुरु आहे.
ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सहायक फौजदार शकील शेख, हेड कोन्स्टेबल शंकर चौधरी, अजय साठे, पोहेकों दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, सुनिल पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, आदींच्या पथकाने केली.