अहिल्यानगर – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध जुगार धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने कोपरगाव शहर व तालुक्यातील दोन ठिकाणी कारवाई करून एकूण २६ इसमांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून १३ लाख ६३ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पहिली कारवाई कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश शिवारातील कांद्याच्या चाळीत करण्यात आली.
येथे कल्याण मटका नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून १९ इसमांना अटक केली. याठिकाणी काही आरोपी पळून गेले असून मुख्य बुकी रविंद्र माधव सानप फरार आहे.
इतर आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन्स आणि वाहने असा एकूण १० लाख ७९ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील जेऊर पाटोदा शिवारात करण्यात आली. रविंद्र ढोक याच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटक्यावर जुगार खेळला जात होता. पोलिसांनी छापा टाकून ६ इसमांना अटक केली.
त्यांच्याकडून २ लाख ८४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण २५ जणांना अटक करून रोख, मोबाईल व वाहने असा मिळून १३.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सहायक फौजदार शकील शेख, हेड कोन्स्टेबल शंकर चौधरी, अजय साठे, पोहेकों दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, सुनिल पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, सुनिल दिघे, अमोल कांबळे, विजय ढाकणे, दिपक जाधव, जालिंदर दहिफळे यांचे पथकाने केली.