'देऊबाई, अगर आप डराने की कोशिश करेंगी, तो ये लोग आपको गिराने की कोशिश करेंगे.!


लेख वाचण्याआधी 'एक नम्र निवेदन'. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात 'त्रिभाषा सूत्राचे धोरण' जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील 'एक नागरिक' म्हणून, 'मराठीचे शिक्षक' म्हणून व 'मायमराठी प्रेमी' या नात्याने मी माझे विचार पुढील लेखात मांडले आहेत.


'मनोरंजन' हाच उद्देश असल्याने लेखात रंजकता आणण्यासाठी विनोदी शैलीचा आधार घेण्यात आला आहे. यात कुणाला दुखावण्याचा वा कमी लेखण्याचा अजिबात हेतू नाही. हा लेख राजकीय लेख नाही.

केवळ मनोरंजन म्हणूनच तो वाचावा, ही अपेक्षा. आपली मते वेगळी असू शकतात, याची मला पूर्ण जाणीव आहे.! इत:पर जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्यास, त्यांनी हसत हसत मला क्षमा करावी.!

'देऊबाई, आपको डरना जरुरी है.!'

आषाढस्य प्रथम दिवसे, महाकवी कालिदास यांच्या 'मेघदूत' या महाकाव्यामधील विरहव्याकूूळ यक्षाने, रामटेकच्या रामगिरी पर्वतावरून, अलकानगरीतील आपल्या प्रेयसीला, मेघाकरवी जगातील सर्वांगसुंदर, काव्यात्मक संदेश पाठवला होता.

त्याच रामटेक परिसरातील नागपूर - रेशीमबागेतून 'टेकऑफ' घेऊन महाराष्ट्राच्या सध्याच्या मुख्य कारभारीण असलेल्या देऊबाई नागपूरकरीण, ह्या मुंबईत आल्या आणि 'आषाढस्य प्रथम दिवसे'च्या थाटात, समस्त मराठी भाषिकांना संदेश (?) देत, त्यांनी महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा एक 'जी.आर' काढला.

या त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रातील मुलांमुलींना, पहिल्या इयत्तेपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकणे, अप्रत्यक्षपणे सक्तीचे करण्यात येणार होते. म्हणून हा संंदेश, संदेश नसून 'शतप्रतिशत' आदेशच होता.! त्यामुळेच मेघदूतातील यक्षाचा संदेश जेवढा कौतुकास्पद होता, तेवढाच किंबहुना अधिक, देऊबाईंचा हा आदेश संतापजनक आणि टीकेस पात्र होता.!

आजमितीस, महाराष्ट्राचा प्रपंच हा 'तीन बहुरानियाँ'चा संसार आहे.! आणि तो तिन्ही जावा मिळून 'गुण्यागोविंदाने', एकत्रितरीत्या चालवतात. निदान असे मानले जाते. तेव्हा थोरल्या जाऊबाई, देऊबाई नागपूरकरीण, यांनी काढलेल्या जीआर किंवा आदेशाबाबत त्यांच्या दोन्ही जाऊबाईंची काय भूमिका आहे, हे पाहणेही गरजेचे ठरते.

माजी मुख्य कारभारीण असलेल्या आणि आता मनाविरुद्ध सहकारभारीण झालेल्या (म्हणजे थोरल्या जाऊबाईंनी त्या पदावर ढकलून दिलेल्या) 'नाथीबाई ठाणेकरीण' यांनी यासंदर्भात काही ठोस भूमिका घेतल्याचे ऐकिवात नाही. भूमिका घ्यायला काही विचार असावा लागतो.

'खोकी तिकडे डोकी' हाच (अ)विचार असलेल्यांकडून मराठीच्या हिताच्या भूमिकेची काय अपेक्षा करणार.? एक लक्षात घ्या, की मराठी माणूस आणि मराठी भाषा, यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची  स्थापना केली होती.

मात्र आज 'आमचाच पक्ष 'खरी शिवसेना' आहे, बाळासाहेबांच्या विचारांचे 'आम्हीच खरे वारसदार' आहोत,' असं कंठरवाने सांगणाऱ्या नाथीबाई ठाणेकरीण आणि त्यांचा कंपू (यांच्या नाकांवर टिच्चून मराठी भाषिकांवर उघड उघड हिंदी भाषा लादण्याचा घाट घातला जात असताना), याचा विरोधपण करू शकत नाहीत, उलट समर्थनच करतात.! यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट ती कोणती.!

मग त्यांना वरीलप्रमाणे दावा करण्याचा काय अधिकार.? या नाथीबाईंचा म्हणे असाही दावा आहे, की त्या 'धर्मवीर आनंद दिघे' साहेबांच्या शिष्या आहेत.(दुर्दैवाने आज धर्मवीर आनंंद दिघे हयात नाहीत, नाहीतर 'हमने जफा न सीखी, तुमको वफा न आई..' म्हणत त्यांनी तीन वर्षांपूर्वीच यांंना चांंलाच इंगा दाखवला असता.)

नाथीबाई या आनंद दिघे यांच्या शिष्या आहेत की नाहीत, हा मुद्दा बाजूला ठेवूया. त्या 'दिघे'च्या -'दिल्या -घेतल्याच्या' - शिष्या-अनुयायी मात्र निश्चितच आहेत आणि यापुढेही राहतील ! दि= दिले (त्यांनी खोक्यांनी दिले), घे= घेतले (आम्हीपण खोक्यांनीच घेतले.) या अर्थाने त्या 'दिघे'च्या शिष्या.! (याला म्हणतात Reading between the lines ! नव्हे नव्हे Reading between the Letters!)
    
मराठी असे रसाळ,
प्रेमळ आम्हा काय त्याचे ?
दान देती जे खोक्यांचे,
आम्ही नि:शंक दास तयांचे.!
हे तर यांचे बोधवचन.!

त्यानुसार मराठी भाषेचे हित पाहण्याऐवजी, या जाऊबाई, त्यांचे नि त्यांच्या गोतावळ्याचे हित जपण्यातच धन्यता मानणार.! शिवाय दुसरी गोष्ट अशी, की त्या आता थोरल्या जाऊबाईंना विरोधही करू शकत नाहीत आणि महाराष्ट्राच्या मुख्य कारभारीणही होऊ शकत नाहीत.!

जर त्यांच्या मनासारखं काही घडलं नाही, तर त्या फक्त आणि फक्त 'अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी' अर्थात 'रुसू बाई रुसू, दरेगावी जाऊन बसू' या मौन ॲक्टिंगचा (मोनो ॲक्टिंग नव्हे.!) हातखंडा प्रयोग सादर करू शकतात.!

आणि या धाकट्या जाऊबाई.!बारामतीच्या 'शरद केंद्रीय विद्यालयात' शिक्षण घेतलेल्या, अजिताबाई बारामतीकरीण ! यांनी मात्र कधी नव्हे ती परखड भूमिका घेतली ! त्यांंनी थोरल्या जाऊबाईंना घरचा अहेर देऊन चक्क तोंडावरच पाडले.!

त्यांनी जाहीररीत्या सांगून टाकले की, महाराष्ट्रात पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषेची सक्ती करणे चुकीचेच आहे.! धाकट्या जाऊबाईंच्या या भूमिकेने देऊबाईंची चांगलीच गोची झाली. देऊबाईंच्या राजकीय भाषणांचा इतिहास पाहिला, तर असे दिसते की, सभेमध्ये त्या अनेकदा मराठी ऐवजी हिंदीतूनच भाषण करतात.

कदाचित त्यांंना मायबोलीपेक्षा हिंदी अधिक जवळची वाटत असावी.! महाराष्ट्राच्या 'मुख्य कारभारीण' म्हणून त्यांची पहिली टर्म सुरू असताना मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका राजकीय सभेसाठी शिर्डीत आले होते. त्या सभेत देऊबाई, केवळ एकट्या मोदींसाठी हिंदीतून बोलल्या.!

दुसर्‍यांदा पुन्हा मुख्य कारभारीण पद मिळाल्यानंतर (की, मिळवल्यानंतर?), काही दिवसांपूर्वीच, नागपूरमधील संघाच्या एका कार्यक्रमात, मोहनाबाईंच्या उपस्थितीत त्या पुन्हा हिंंदीतूनच बोलल्या.! अशी बरीच उदाहरणे देता येतील.

देऊबाईंनी महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे जे धोरण जाहीर केलंय, ते त्रिमिती धोरण आहे.! Three Diamension ! थ्रीडी सिनेमा पाहण्यासाठी जसा विशिष्ट चष्मा लागतो, तसे विशिष्ट चष्म्यातून पाहिल्यावरच देऊबाईंच्या त्रिभाषा सूत्राच्या तीन मिती स्पष्ट दिसतील.

त्यातील 'पहिली मिती' म्हणजे सासूबाई कमळाबाईंच्या आपल्यावरील मायेची गुणवत्ता वाढवणे. आजेसासूबाई मोहनाबाईंचा पण आपल्यावरील वरदहस्त कायम राहील, याची दक्षता घेणे, ही दुसरी मिती ! आणि तिसरी मिती म्हणजे महाराष्ट्रातील - विशेषत: शहरी भागातील हिंदीभाषिक मतदारांची सहानुभूती संपादन करणे.!

(स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत) या तिन्ही मिती सारख्याच महत्त्वाच्या आहेत.! या त्रिभाषा सूत्राचे, 'देऊबाई देऊ करती ओसरी अन् हिंदी हातपाय पसरी,' असे एका वाक्यात वर्णन करता येईल.! 

महाराष्ट्रात इ.१ ली ते इ. ४थी च्या मुलांना  तिसरी भाषा म्हणून, हिंदी शिकण्याची सक्ती करणारे हे 'त्रिभाषा सूत्र' जाहीर झाल्यावर त्याला सगळीकडून विरोध झाला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, भाषेचे अभ्यासक, अशा सर्व थरांतील विचारवंतांनी या धोरणाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी अगदी पोटतिडकीने आपापली मते मांडली.

इ.१ली ते इ. ४थी पर्यंत मुलांना फक्त एकच भाषा, म्हणजे मातृभाषाच शिकवली पाहिजे. इंग्रजीसुद्धा नको.!  सहा ते दहा या वयोगटातील मुलामुलींना खेळता खेळता शिकवायचे असते, शिकता शिकता खेळणे नव्हे.! यात मुले भरडली जातील. अनेक पिढ्या बरबाद होतील. महाराष्ट्र व महाराष्ट्राची संस्कृती नष्टप्राय होण्याची भीती आहे.!

कलाकौशल्य शिकण्याचा वेळ हिंदी शिक्षणासाठी वळवणे, फारच अन्यायकारक आहे. हा अविवेकी हट्ट सोडावा, असे ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवारांचे मत आहे. विद्यार्थिसंख्या २० पेक्षा कमी असेल, तर ही हिंदी भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकवावी, अशी तरतूद या धोरणात करण्यात आलीय.

त्याला आक्षेप घेताना व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डाॅ. मुक्ता पुणतांबेकर म्हणतात की, इतक्या लहान वयात ऑनलाईन शिकवण्याची पद्धत घातक ठरू शकते. मुलांना स्क्रीनचे व्यसन लागू शकते. त्यामुळे मोबाईलचा वापर अनियंत्रितपणे वाढत जाईल आणि त्यामुळे मुले हट्टी बनतील, त्यांंचा चिडचिडेपणा वाढेल व त्यांना दृष्टिदोषालाही सामोरे जावे लागेल !

यामुळेच तर 'युनेस्को'ने लहान मुलांसाठी स्मार्टफोन बंदीची शिफारस केलेली आहे.! तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यातील नात्याच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य यांनीपण एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. त्या म्हणतात की, इ.१ली च्या मुलांना ऑनलाईन पद्धतीने भाषा शिकवली जाऊ शकत नाही.

वर्गात भाषाशिक्षक उपस्थित असणे आवश्यकच आहे.! हा मुद्दा स्पष्ट करताना त्यांनी लाॅॅकडाऊन काळातील आपले निरीक्षण नोंदवीत सांगितले, की लाॅकडाऊन काळात ऑनलाईन पद्धतीने झालेल्या शिक्षणात अन्य विषयांच्या तुलनेत भाषाविषयांचे शिक्षण चांगले झालेले नाही, ही बाब त्यांंनी समोर आणली.

इतकेच नाही, तर शिक्षण खात्यातील अधिकारी वर्गानेही आपली नावे गुप्त ठेवण्याच्या अटीवर बोलून दाखवले की, हे धोरण अयोग्य असून याची अंमलबजावणी करणेपण अडचणींचे ठरेल.!

देऊबाईंनी कदाचित या सर्वांना  न जुमानता, आपले त्रिभाषासूत्राचे धोरण पुढे रेटलेही असते. परंतु एक आक्रित घडले.! दोन सेनांंचे सरसेनापती असलेल्या दोन्ही ठाकरे बंधूंनी आपल्या सैनिकी सामर्थ्यासह एकत्र येत, महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करू देणार नाही असे म्हणत, देऊबाईंंविरुद्ध रणशिंग फुंकले.! त्यांनी देऊबाईंना जबरदस्त आव्हान दिले.!

आता या दोन 'आग्या मोहळां'चा सामना कसा करायचा, असा पेच देऊबाईंना पडला. तरी नशीब, वारकरी पंढरपूरच्या वारीत गुंतलेले आहेत. नाहीतर, त्यांनी आपल्या निषेधाच्या दिंड्या चक्क मंत्रालयावरच धडकवल्या असत्या.!

कारण तुकोबांची गाथा बुडवणाऱ्या रामेश्वर भटांच्या भूमिकेत शिरलेल्या आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या मायबोली मराठीला अरबी समुद्रात बुडवायला निघालेल्या देऊबाईंना व त्यांच्या कारभारी मंडळींना वारकर्‍यांनी सोडलेच नसते.!

आणि आषाढी एकादशीनिमित्त देऊबाईपण श्री विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी कोणत्या तोंडाने पंंढरपूरला गेल्या असत्या.? वारकऱ्यांनी देऊबाईंना पंढरपुरात पाय तरी ठेवू दिला असता काय.? मुळीच नाही.! देऊबाई करायला गेल्या एक आणि झाले भलतेच.!

त्यांंची हालत, शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील निसर्गरम्य कोकणचा लचका तोडण्यासाठी, प्रचंड फौजफाट्यासह मोठ्या ऐटीत, उंबरखिंंडीत शिरलेल्या 'कारतलब खाना'सारखी झाली.! शिवछत्रपतींनी वेळीच हा धोका ओळखून खानाच्या सैन्याला उंबरखिंंडीतच घेरले आणि बिनशर्त शरण येण्यास भाग पाडले.!

उंबरखिंंडीत अडकल्यानंतर घाबरलेल्या कारतलब खानाने बिनशर्त शरणागती पत्करून आपली सुटका करून घेतली. अगदी तसेच.. त्रिभाषा सूत्राच्या खिंडीत अडकलेल्या, देऊबाईंनीपण होत असलेल्या विरोधाला घाबरून त्रिभाषा सूत्राचा तो आदेशच रद्द करून टाकला व आपली सुटका करून घेतली.!

या सर्व प्रकारावरून देऊबाईंना एक प्रेमाचा सल्ला द्यावासा वाटतोय. अर्थात हा संदेश त्यांना हिंदीतूनच दिला पाहिजे, कारण त्यांना मराठीपेक्षा हिंदी अधिक जवळची आहे ना.!

"देऊबाई, हम आपको एक नसीहत देते हैं कि, आप चाहे कुछ भी कीजिए अथवा न कीजिए, लेकिन मराठीजन और मराठी भाषा के साथ जरा भी खिलवाड़ न कीजिए.! अगर आप इन्हें डराने की कोशिश करेंगी, तो ये लोग आपको गिराने की कोशिश करेंगे.! इसलिए आपकी भलाई इसमें है कि, आप इन बातों से डरती रहें.! देऊबाई, आपको डरना जरूरी है.! बहुत जरूरी है.!

- सीताराम शिंदे (बोरिवली, मुंबई)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !