अहिल्यानगर - जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये वकिलांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची काल वकील संघटनेच्या प्रतिनिधींनी भेट घेतली.
यावेळी वकिलांवर होणारे जिवघेणे हल्ले, कौटुंबिक आणि जिल्हा न्यायालयातील खटल्यांतील आरोपींना समन्स वा वॉरंट बजावणीत होणारा विलंब, तसेच पोलीस स्टेशन आणि भरोसा सेल येथे वकिलांना येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत, पोलीस अधिकाऱ्यांकडून वकिलांशी होणारी वागणूक, कोर्ट ऑर्डलींची उपलब्धता आणि न्यायालय परिसरातील पोलीस सुरक्षा यासारखे महत्त्वाचे विषयही चर्चेला घेण्यात आले. घार्गे यांनी सर्व मुद्द्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
या महत्वपूर्ण बैठकीस कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे, कौटुंबिक वकील संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. शिवाजी अण्णा कराळे, उपस्थित होते.
वकिलांवरील हल्ले आणि त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घेत, पोलिस प्रशासन आणि वकील संघटना यांच्यात सुसंवाद वाढवण्याच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
यावेळी उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड, सचिव ॲड. राजेश कावरे, माजी अध्यक्ष ॲड. संजय पाटील, ॲड. आनंद सूर्यवंशी, ॲड. अजिंक्य काळे तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.