हा 'राग' येतो आणि आपलं प्रचंड नुकसान करुन, त्या क्रोधाने आपण समोरच्यांना अपशब्द बोलून सोलून काढतो.. रक्तबंबाळ करतो, समोरच्याचा विध्वंस झालेला असतो मनाचा अन काळजाचाही..!
राग का येत असतो ? समोरचा मला अनुकुलच असावा, मला इतरांकडून आदर कौतुक हवंय, माझ्या अपेक्षा इतरांनी पूर्ण कराव्यात. प्रत्येक जणच हा ज्वालामुखी हृदयात घेऊनच जगत असतो.
त्यातल्या त्यात संवेदनाशील माणसांच्यात 'हा' अधिक असतो. अर्थात मी फार स्वच्छ आहे. नेहमीच करेक्ट असतो त्यामुळे तोंडावर फाडफाड बोलतो, असं काही माणसं समर्थनही करत असतात. असं करत असाल तुम्ही चुकीचे आहात बरं.
तुमच्या मनावर, जीभेवर तुमचं अजिबात नियंत्रण नाही. क्रोध तुम्हाला नियंत्रित करतोय.. तुमचं जगणं तुम्ही क्रोधावर नियंत्रित करता. बऱ्याचदा समोरचा आपल्याला हवं तसं वागणार बोलणार नाहीच. त्याचं मत नम्रपणे, प्रेमाने, प्रसंगी कठोरतेने बदलता आलं तर पहावं.
कुठल्याच प्रकारची शाब्दिक हिंसा नको. हे पेरु नका. वाईटपण लगेचच रुजतं. त्याला दुराव्याची फळही ताबडतोब लागतात. नाती सहवासांनी, प्रेमाच्या कोवळ्या ऊन्हातच भिजतात अन रुजतातही.
एकदा रुजली की परत त्यांच्यावर मध्यान्हीचं कडक ऊन पडू देता कामा नये. हे मध्यान्हीच्या अपेक्षांचे ऊन नात्यावर पडले की ते रोप करपून जाते. नंतर त्या क्रोधाचा, निसरड्या शब्दांचा कित्ती पश्चात्ताप झाला तरी सगळं संपतं. नातंही आणि प्रेमही.
समोरच्या व्यक्तिने आपल्याला हवे तसे वागले नाही की राग येतो. अशावेळी परिस्थितीवरील नियंत्रण जसे कमी होते तसेच आपले आपल्यावरील नियंत्रण कमी होते. राग ही सुध्दा नकारात्मक उर्जा आहे.
तो असे वागला तर मी जशास तसे वागणार या उक्तिप्रमाणे जगणारांना यात स्वतःचेच भावनिक, मानसिक नुकसान होत असते हे लक्षातही येत नाही. आपण साक्षी भावाने रागाचे, नकारात्मक उर्जेचे परिवर्तन करायला शिकले पाहिजे.
स्वतःच्या बलस्थानाचा क्षमतेचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्याशी वाईट वागणारी व्यक्तिची मुल्ये, संस्कार, सवयी त्याला तसे वागायला प्रवृत्त करत आहेत. बाभळीच्या झाडाला आम्रफल लागण्याची किंवा नम्रतेची शक्यता नसतेच.
तर आपणही अशा मुर्ख लोकांकडून अपेक्षा करणं चुकीचचं नाही का ? साक्षीभाव म्हणजे स्वतःकडे आणि आलेल्या परिस्थितीकडे शांतपणे पहाण्याची, परिस्थितीला आणि व्यक्तिला आहे तसे स्विकारण्याची कला आहे.
आयुष्याच्या वाटेवर चालताना अपमान करणे, अपेक्षाभंग करणारे लोक पावला पावलांवर भेटत रहातील. त्यांच्याकडे साक्षीभावाने पहात पुढे जायची सवय नक्कीच लावून घेऊया. होय ना.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)