अहिल्यानगर - महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू व मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई केली. १ लाख ३३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत, तर दोन जण फरार आहेत. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली ११ जुलैला पाथर्डी शहरात ही कारवाई केली.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार अक्षय पान टपरी, मोहटादेवी रोड, पाथर्डी येथे सुगंधी तंबाखू विक्री होत असल्याचे समजताच पोलिस पथकाने छापा टाकला. या ठिकाणी अभिजीत मिनीनाथ लांडे (वय ५२, रा. आनंदनगर, पाथर्डी) याला ताब्यात घेऊन ५,६०० रुपये किंमतीचा ८ किलो तयार मावा जप्त केला.
त्याच्या माहितीनुसार पोलिसांनी अक्षय गणेश इधाटे (रा. इंदीरानगर, पाथर्डी) याच्या घरावर छापा टाकला असता, घरालगतच्या शेडमध्ये ६५ किलो सुगंधी तंबाखू (किंमत ६० हजार ८०० रुपये) सापडली. मात्र अक्षय इधाटे फरार असल्याचे आढळले.
त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तनपुरवाडी फाटा, पाथर्डी येथील शेडवर कारवाई केली असता सुनिल बाबासाहेब सानप (वय ३६, रा. शिरसाटवाडी, पाथर्डी) हा मशीनवर मावा तयार करताना आढळून आला.
या ठिकाणी १० किलो तयार मावा, ६ किलो सुगंधी तंबाखू आणि ५५ हजार रुपये किंमतीची मावा तयार करण्याची मशीन जप्त करण्यात आली. या प्रकरणात राहूल अर्जुन सानप (रा. शिरसाटवाडी, पाथर्डी) हा देखील फरार आहे.
या कारवाईत १८ किलो तयार मावा, ७१ किलो सुगंधी तंबाखू आणि १ मशीन असा एकूण १ लाख ३३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाथर्डी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व पोलिस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, अरविंद भिंगारदिवे, उमेश खेडकर, सुनिल पवार, सुनिल दिघे, अमोल कांबळे, आदींच्या पथकाने केली आहे.